बारामती : महान्यूज लाईव्ह
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून, बारामतीमध्ये 29 जुलै रोजी शहरांमध्ये ओबीसी एल्गार महामोर्चा होणार असल्याचे आरक्षण कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात मोठ्या प्रमाणावर कोविड चे रुग्ण आढळत असल्याच्या कारणावरून शहर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.
त्यामुळे या प्रकरणावरून वातावरण चिघळण्याची चिन्हे आहेत. शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी यासंदर्भात कलम 149 अन्वये आरक्षण कृती समितीला नोटीस बजावली आहे. या आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे ओबीसी नेते छगन भुजबळ, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे, पंकजा मुंडे, माजी आमदार योगेश टिळेकर, खासदार इम्तियाज जलील, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आरक्षण कृती समितीच्या वतीने देण्यात आली होती.
पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीवर अद्याप आरक्षण कृती समितीच्या वतीने स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र या विषयावरून बारामतीत ओबीसी आरक्षण कृती समितीचे नेते काय प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळतात याची आता उत्सुकता आहे.











