किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
बारामती : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांना उतिसंवर्धित (टिशू कल्चर ) रोपांची सभासदांच्या मागणीप्रमाणे वितरण कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.
कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या सूचनेनुसार सभासदांचे उसाचे एकरी उत्पादन वाढण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथून कारखान्याने मागवलेली कोएम 265 व कोसी 86032 या वाणाची रोगमुक्त ऊसाची रोपे वितरित करण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांनी रोगमुक्त बियाण्याची निवड करणे गरजेचे आहे. उतिसंवर्धित उसाच्या रोपांपासून रोगमुक्त बेणेमळा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी ही रोपे लावावीत. उसाच्या एका कोंबापासून प्रयोगशाळेमध्ये साधारण एक लाख रोपे तयार केली जातात. ही रोपे विशिष्ट वातावरणात व अन्नद्रव्य देऊन त्यांची वाढ केली जाते. त्यामुळे एकरी उत्पादन वाढण्याबरोबरच रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता फुटव्यांचे प्रमाण रोपांमध्ये असते. आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सभासदांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी केले.
शेतकऱ्यांनी उसाच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने ,दोन ओळी मधील व दोन रोपां मधील योग्य अंतर तसेच आडसाली उसाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच औषध फवारणी या विषयी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी प्रवीण कांबळे (7588254164) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यालयीन अधिक्षक अशोक मोरे, मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, ऊस विकास अधिकारी प्रवीण कांबळे, सुपरवायझर महेश काटे, अरुण लोदाडे, स्वप्निल गावडे, उमेश निंबाळकर, विनायक कदम यांच्यासह अधिकारी व सभासद उपस्थित होते.











