बारामती : महान्यूज लाईव्ह
शारदाबाई पवार महिला आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शारदानगर, माळेगाव बु., ता. बारामती या महाविद्यालयाची डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांनी ‘डीबीटी स्टार कॉलेज’ योजनेकरिता निवड केली आहे.
देशातील मोजक्याच महाविद्यालयांना सदर योजने करता निवडले जाते. या महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र व वनस्पतीशास्त्र या विभागांना सदर योजनेकरिता निवडले गेले आहे. या योजनेअंतर्गत महाविद्यालयाला 45 ते 50 लाख इतके अनुदान प्राप्त होणार असून महाविद्यालयातील सदर विभागातील पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना याचा फायदा होणार आहे.
विभागाचे उपकरणीय दृष्टिकोनातून सबलीकरण होणार असून त्याचा प्रत्यक्ष फायदा हा विद्यार्थिनींना नवनवीन प्रयोग व संशोधन आधारित प्रकल्प राबविण्याकरिता होणार आहे.पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींकरता, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, विविध चर्चासत्रे, परिषदा, प्रशिक्षणे आयोजन करण्या करता किंवा भाग घेण्याकरता सदर योजनेचा उपयोग केला जातो, असे या योजनेचे समन्वयक व उपप्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी यांनी सांगितले.
स्टार कॉलेज योजना देशभरातील विज्ञान शिक्षण सुधारण्यासाठी स्नातक शिक्षण देणारी महाविद्यालये आणि विद्यापीठांना पाठिंबा देण्यासाठी डीबीटी ने 2008 मध्ये सुरू केली होती. मूलभूत विज्ञान विषयात पदवी स्तरावरील प्रयोगात्मक विज्ञानावर वैचारिक सुधारणा आणि प्रोत्साहित करण्याकरिता ही योजना सुरु केली गेली.
या योजनेमध्ये निवड झाल्यामुळे महाविद्यालयातील विभाग आणि महाविद्यालयाची उत्कृष्टता ओळखली जावी असे डीबीटी चे धोरण असते. शैक्षणिक आणि प्रयोगशाळेच्या कामांसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याकरिता सदर योजना मदत करते त्यामुळे महाविद्यालयातील आपणास उत्तम चालना मिळून विद्यार्थ्यांचे प्रायोगिक विज्ञानाचे उत्तम प्रदर्शन होते.
ही योजना विद्यार्थ्यांना पदव्युत्तर स्तरीय उच्च शिक्षण, पदव्युत्तर संशोधन अथवा पीएच.डी., पोस्ट डॉक्टरेट संशोधन, आंतरराष्ट्रीय स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम, उद्योगाभिमुख प्रशिक्षण अभ्यासक्रम घेण्याकरिता एक उत्प्रेरक म्हणून काम करते. वैज्ञानिक नेटवर्क मध्ये व्यस्त राहण्यासाठी तसेच संशोधन संस्था व उद्योगांना भेट देण्यासाठी आणि पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर भविष्यातील आव्हानासाठी त्यांना तयार करण्याकरिता, संशोधन अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी तरुणांची मानसिकता प्रज्वलित करण्याकरिता उद्युक्त करते.
शारदाबाई पवार महिला आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र व वनस्पतीशास्त्र या तीनही विभागातील अध्यापक व विद्यार्थी संशोधनामध्ये अग्रेसर भूमिका बजावत आहेत. मातृसंस्था ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून शेतीजन्य विकासावर संशोधन करीत आहेत.
आजपर्यंत या विभागातील विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी 60 पुस्तके आणि 585 संशोधन लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स- नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत. संस्थेकडे उत्कृष्ट पायाभूत व वैज्ञानिक सुविधा असल्यामुळे संशोधनास विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रयोग शाळेसारखी सुविधा बारामती मध्ये मिळू लागली आहे.
या महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी, ऑरगॅनिक व एनालिटिकल केमिस्ट्री, बॉटनी, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, सायकॉलॉजी व कॉमर्स या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण तसेच पीएचडी साठी संशोधन केंद्राची सुविधा मिळत आहे. स्टार कॉलेज योजने करिता निवड झाल्याने या महाविद्यालयातील शिक्षणाला आणखी प्रायोगिक सोयीसुविधा मिळणार आहेत, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. साठे यांनी सांगितले. या योजनेकरिता निवड झाल्यामुळे ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, सेक्रेटरी सौ. सुनंदा पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे यांनी अभिनंदन केले.











