दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वैयक्तिक कॅश क्रेडीट कर्ज योजनेचा व्याजदर कमी करावा अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक महासंघ राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांना देण्यात आले.
जिल्हयातील अनेक शिक्षकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून वैयक्तिक कॅश क्रेडीट कर्ज योजनेचा लाभ घेतला आहे. या कर्जाचा व्याजदर इतर राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा खूप जास्त आहे. राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे या बँकेतील वैयक्तिक कॅश क्रेडीट कर्ज योजनेचा व्याजदर (७% ) सात टक्के करण्यात यावा. त्यामुळे शिक्षक इतर बॅंकेत पगार खाते व कर्ज खाते उघडण्यासाठी जाणार नाहीत. त्यामुळे बॅकेने कॅश क्रेडिट व्याज दर (७ %) पर्यत कमी करावा अशी मागणी निवेदनात केली आहे. हे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनाही देण्यात आले आहे.
दरम्यान, येत्या आठवड्यात बॅंकेच्या होणार्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन थोरात यांनी दिले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पवार, प्रशांत वाघमोडे, दौड तालुका अध्यक्ष दुर्योधन चव्हाण, तालुका उपाध्यक्ष श्याम बेंद्रे ,दौंड शिक्षक पतसंस्थेचे संचालक विश्वनाथ कौले आदी पदाधिकारी उपस्थित होते.











