By Team Mahanews live
बॉलीवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्राला पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसला असून सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. सुरेखा सिक्री या कलर्स वाहिनीच्या बालिका वधू या मालिकेतील भूमिकेमुळे आज सुद्धा ओळखल्या जातात .
याव्यतिरिक्त बधाई हो मध्ये सुद्धा त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता. सुरेखा सिक्री यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या व आपल्या अभिनयाने प्रत्येक भूमिकेला जिवंत करणाऱ्या सुरेखा सिक्री यांच्या निधनाने टेलीविजन विश्व आणि बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
सुरेखा यांचे मृत्यू समयी वय ७५ वर्षे होते. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. आधीही २०१८ साली पहिल्या ब्रेन स्ट्रोकला सामोरं जावं लागलं होतं. गेल्या वर्षी त्यांना दुसरा ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांची तब्बेत गुंतागुंतीची झाली होती. त्यामुळे त्यांचं आजारपण बळावलं. आज सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
सुरेखा सिक्री यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. आयुषमान खुराना प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातील सुरेखा सिक्री यांची भूमिका विशेष लक्षात राहते. सुरेखा सिक्री यांना त्यांच्या अभिनयासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘बालिका वधु’ सारख्या मालिकेत त्यांची दीदी सा ची भूमिका लोकांच्या मनात घर करून आहे. दरम्यान, सुरेखा सिक्री यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केले.











