विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : काळ्या पिशवीमध्ये कोहळ्याला एका मुलीचा फोटो टाचणीच्या सहाय्याने टोचण्यात आला होता आणि त्यावर कुंकू लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पाबळ या ठिकाणी घडला आहे. दरम्यान, गावातील काही लोक दशक्रियाविधीसाठी स्मशानभूमीत गेले असता हा सगळा प्रकार त्यांच्या नजरेस पडला.
दरम्यान, यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार लोकांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी तेथील स्थानिक पत्रकाराशी संपर्क केला आणि याबाबतची माहिती कळवली.
याविषयी बोलताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव म्हणाल्या, की करणी लावण्यासाठी किंवा त्या व्यक्तीचे वाईट व्हावे, या उद्देशाने उतारे टाकण्यात आलेले असतात. परंतु, हे लक्षात घ्या की त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे वाईट होत नसते. उतारे टाकणारे लोकांची एक विकृती असते, यामुळे अशी कृत्य केली जातात. त्यामुळे गावातील लोकांनी एवढेच सांगणे आहे की अशा लोकांना कोणीही घाबरून जाऊ नये. त्यांचा शोध घेऊन पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी.











