मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्याचे सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्य लोकसेवा आयोगामार्फत लवकरच 15 हजार 511 पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली. यामध्ये गट-अ ते गट-क पर्यंतच्या पदांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथील स्वप्निल लोणकर या एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या युवकाची आत्महत्या झाल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. राज्यातील तरुणांच्या मनातील नोकरी विषयीच्या आशंकांची भीती दूर करताना सरकारने एमपीएससीमार्फत तातडीने रिक्त पदे आहेत, ती भरली जाणार असल्याची घोषणा केली.
त्यानुसार आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्त पदांसंदर्भात बैठक झाली. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग या खात्यांना पद भरतीसाठी आत्तापर्यंतचे सरकारचे जे निर्बंध होते, त्यातून सूट दिली असून गट अ श्रेणी मधील 4417, गट ब मधील 8031, गट क श्रेणीतील 3063 अशी 15 हजार 511 जणांची नोकर भरती करण्यास मान्यता देण्यात आली.
उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली ही भरती पूर्ण करण्यासाठी एमपीएससी मधील रिक्त जागा देखील भरण्याचे आदेश दिले असून, जुलैपर्यंत या सर्व जागा भरून, लगेच भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आजच्या बैठकीत देण्यात आले. याची माहिती भरणे यांनी दिली.











