पुणे : महान्यूज लाईव्ह
देशातील सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार वारेमाप सुरू आहे अशी चर्चा सातत्याने होत असते यामध्ये कोणतीच क्षेत्रे रिकामी राहिलेली नाहीत असेही म्हटले जाते मात्र सगळ्यात शेवटी न्यायाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था अजूनही लोकांच्या विश्वासातील आहे मात्र या विश्वासाला तडा देण्याचे काम अधून मधून न्यायव्यवस्थेत देखील होताना दिसते याचा प्रत्यय आज आला.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने खेडमधील अतिरिक्त सरकारी वकिलास साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. देवेंद्र मधुकर सोन्नीस (वय 57) या वकीलावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या नातेवाईकांच्या जामिनावर सुनावणी होत असताना न्यायालयात हरकत घेऊ नये व जामीन मिळण्यासाठी मदत करावी यासाठी तक्रारदाराने मागणी केल्यानंतर देवेंद्र सोनीस यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पडताळणी केल्यानंतर ती खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि या सापळ्यात तडजोडी आणखी साडेतीन हजार रुपये घेताना सरकारी वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले.











