पुणे : महान्यूज लाईव्ह
स्थळ : विश्रामबाग पोलीस ठाणे.. वेळ : दुपारी चारची.. एका शिक्षकाला काहीजण काळे पासून पोलीस ठाण्यात आणतात आणि जेव्हा माहिती कळते तेव्हा पोलीस देखील चक्रावून जातात..! गुरु धर्माला काळिमा फासणारी घटना विद्येच्या माहेरघरात घडली.. शालेय अभ्यासक्रमातील गुण वाढवून देतो असे सांगत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या या शिक्षकाला काळे फासून, त्याची पुण्यातील रस्त्यावरून धिंड काढण्यात आली.
या घटनेने संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात या घटना घडत असतील, तर इतर शहरातून जिल्ह्यातून या शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा काय? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यात बारावीत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीला गेल्या काही दिवसांपासून संबंधित शिक्षक हा गुण वाढवून देतो, असे सांगून शरीरसुखाची मागणी करत होता.
ही मागणी वारंवार होत होती. विद्यार्थिनीने त्याला नकार दिला, मात्र तरीदेखील शिक्षकाचा हा पाढा सुरूच राहिल्याने, अखेर या तरुणीने संबंधित शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केला आणि तो घरच्यांना दाखवला. त्यानंतर आज दुपारी या तरुणीचे नातेवाईक आणि काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी महाविद्यालयात जाऊन या शिक्षकांना जाब विचारला व त्यानंतर त्याला मारहाण करून तिच्या तोंडावर शाई फासली आणि महाविद्यालयापासून विश्रामबाग पोलिस ठाण्यापर्यंत त्याची रस्त्यावरून धिंड काढली.











