खंडाळा : महान्यूज लाईव्ह
“महाराष्ट्राच्या एका खेड्यातील १२ वर्षाचा शिक्षणाचा गंध नसलेला शेतकऱ्याचा मुलगा दत्तक पुत्र म्हणून बडोदा संस्थानाचा राजा बनतो आणि राजा बनल्यानंतर पुढील सहा वर्षात शिक्षण व प्रशासनाचा अनुभव घेत सर्वसामान्य जनतेच्या प्रगती आणि परिवर्तनासाठी धर्म आणि शिक्षण ह्या दोन महत्वाच्या घटकांची सांगड घालण्याची खुणगाठ बांधत जे कार्य सयाजीराजानी केले त्याला भारतीय इतिहासात तोड नाही ” असे प्रतिपादन साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समितीचे प्रमुख जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी केले अशी माहिती महा.अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका ऑनलाईन व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून भांड बोलत होते. यावेळी त्यांचे हस्ते अंनिस वार्तापत्राच्या जुलै अंकाचे प्रकाशन संपन्न झाले. ते पुढे म्हणाले की, सयाजी महाराजांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा, उद्योग, साहित्य, कला, धर्म, अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रात केलेले काम त्या काळातील ५६५ भारतीय संस्थानिकाच्या तुलनेत केवळ अद्वितीय असेच होते पण हे त्यांचे कार्य गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचू शकले नाही, याची खंत व्यक्त केली.
शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समिती, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्था औरंगाबाद हे कार्य संशोधन ग्रंथ, पुस्तके, ईबुक यांच्या सहाय्याने पोहचवत असल्याचे सांगून ते म्हणाले, “आर्थिक नुकसानीत असलेल्या राज्याचा कारभार हाती घेताच आर्थिक काटकसरीचे उपाय योजताना सयाजीराव महाराजांच्या लक्षात आले. राज्यासाठी होणाऱ्या खर्चातील बराचसा भाग जवळ जवळ १०टक्के हिस्सा हा राजघराण्याच्या पूजाविधी, कर्मकांडे, दानदक्षिणा, विविध अंधश्रद्धाच्या नावाखाली अनाठायी खर्च होत आहे मग याला कायद्याने पायबंद कसा घालता येईल यासाठी त्यांनी समिती नेमून तो खर्च कमी केला. हा त्यांचा प्रयत्न म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्वप्नांच्या पूर्तीसाठीची पायाभरणी होती.”
या समारंभात प्रमुख वक्ते म्हणून “युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड आणि महाराष्ट्र ” या विषयावर यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागप्रमुख व महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनकार्याचे अभ्यासक व ११० ई बुकद्वारे प्रकाशित होणाऱ्या “सयाजी ज्ञानमाला”चे प्रमुख संपादक प्रा. दिनेश पाटील म्हणाले की, ”मध्ययुगीन सरंजामदारी पार्श्वभूमीवर सयाजीराव महाराजांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात जे काम उभे केले त्या कामाचे अधिष्ठान ज्ञान आणि विवेक हे होते. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम आणि सयाजीराव गायकवाड यांच्या विज्ञानवादी भूमिकेचे जवळचे नाते आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे व्याख्यान आयोजित करुन ते नाते अधोरेखित केले आहे.” असे प्रतिपादन करून सयाजीराव यांचे संपूर्ण जीवन एकाच व्याख्यानाच्या मर्यादेत सांगणे अशक्यच आहे असे सांगून त्यांनी सयाजीरावांची सुरुवातीची जडणघडण, फुले, शाहू, आंबेडकर आणि सयाजीराव आणि सयाजीराव यांनी केलेल्या धार्मिक सुधारणा व कायदे अशा तीन टप्प्यात आपल्या भाषणाची मांडणी केली.
सयाजीरावांच्या सुरुवातीच्या जडणघडणी संबंधी बोलताना ते म्हणाले, “अक्षर ओळख ही नसलेला १२ वर्षाचा मुलगा ते उत्तम प्रशासक अशी जडण घडण होण्यात त्यांचे गुरुजन केशवराव पंडित, भाऊ मास्तर, इलियट सर व त्यांच्या मातोश्री जमनाबाई यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या पुढील कार्याचा मुलभूत पाया या त्यांच्या जडणघडणीत दिसून येतो.”
आपल्या व्याख्यानाच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी “फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवनातील सयाजीराव” या मार्गे सयाजीरावांचे महाराष्ट्राच्या पुरोगामी जडणघडणीतील भरीव योगदानाची मीमांसा उदाहरणे देत केली. महात्मा फुले यांच्या बहुजनासाठी मोफत शिक्षण, स्त्री शिक्षण या संकल्पनाची पूर्तता करण्याचे काम महाराजांनी आपल्या संस्थानात आरंभले होते. फुल्यांना महात्मा ही पदवी द्यावी अशी भूमिकाही प्रथम सयाजीराव यांनी घेतली होती.
सयाजीराव शाहू महाराजांचे फ्रेंड, फिलोसॉफर आणि गाईड असल्याचे सांगून ते म्हणाले, “शाहू महाराज व सयाजी महाराज यांच्या संबंधाच्या संशोधनातून कोल्हापूर-बडोदा यांच्या बौद्धिक नात्यावर प्रकाश पडतो व अनेक धोरणांबाबत बडोदा हे कोल्हापूरचे कसे आदर्श होते याचा शोध लागतो” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत सयाजीराव यांचे योगदान सांगताना ते म्हणाले, “सयाजीरावानी बाबासाहेबांना शिक्षणासाठी, चळवळीसाठी वेळोवेळी केलेली मदत सयाजीरावांची जाती अंताची तळमळ दर्शवते.”
आपल्या व्याख्यानाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रा. पाटील यांनी सयाजीरावांच्या धर्मविषयक कार्याचा विचारांचा धावता आढावा घेतला व त्यांनी केलेली स्वतंत्र धर्म खात्याची स्थापना, धर्म साक्षरतेची चळवळ, धार्मिक सुसंवादासाठी तुलनात्मक धर्माभ्यासाच्या अध्यासनाची स्थापना, सर्व धर्म परिषदेचे अध्यक्षपद, बौध्द धर्माबद्दल समज, पाली भाषा अध्यापन याबद्दल उहापोह केला.
अखेरच्या टप्प्यात प्रा.पाटील यांनी बडोदा संस्थांनाने लागू केलेले विधवा पुनरविवाह कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, विशेष विवाह कायदा, हिंदू कोड बिल, धार्मिक स्वातंत्र्य कायदा, ग्राम पंचायत कायदा, मोफत शिक्षण कायदा, हिंदू विधी कायदा असे आधुनिक काळाला अनुरूप कायदे व महाराजांनी काढलेले हुजूरनामे याची माहिती दिली. आपल्या २१००० दिवसांच्या कारभारात जनतेच्या हिताचे महाराजांनी ७३,००० हुजूरनामे काढले होते.
“‘गांधीसारखा हाडामांसाचा माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला यावर पुढील पिढीचा विश्वासच बसणार नाही’, असे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी महात्मा गांधींबद्दल म्हटले होते. हेच वाक्य महाराजा सयाजीराव गायकवाड यांना आपल्या कारकिर्दीत त्यांनी मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रात केलेले काम बघितल्यावर तंतोतत लागू पडते.” असे प्रतिपादन करत सयाजीरावांच्या कार्याचा परिचय महाराष्ट्रातील लोकांना व कार्यकर्त्यांना करून देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आभार मानत त्यांनी आपले व्याख्यान संपविले.
संपूर्ण महाराष्ट्रातून २२० कार्यकर्त्यांचा व महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा मोठा प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ त्रिशला शहा आणि आशा धनाले यांच्या चळवळीतील प्रेरणादायी गाण्याने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले. प्रास्ताविक राजीव देशपांडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अखेरीस नरेंद्र लांजेवार यांनी श्रोत्यांचे, वक्त्यांचे आभार मानले.











