महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
आठ नऊ वर्षाचा मध्यप्रदेशातील एक मुलगा नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर आईवडीलांपासून दुरावतो आणि तो चाईल्ड लाईन संस्थेत आणला जातो. त्याच्या येण्याने समृध्दी आली म्हणून त्याचे नाव अमन ठेवले जाते.. बालसुधारगृहातून नागपूरचे दामले दांपत्य त्याला दत्तक घेतात.. मग तो अमन दामले बनतो..
नऊ वर्षानंतर त्याचे खरे आईवडील त्याला मिळतात..अन तो मोहम्मद अमीर असल्याचे पुढे येते.. अर्थात तोपर्यंत सख्ख्या आईवडीलांपेक्षाही अधिक प्रेम, माया दिलेल्या अमनला दामले कुटुंबही सोडू वाटत नाही.. एकाच वेळी दोन आईवडील वाट्याला आलेल्या या अमनकडे पाहिले, तर मजहब नही सिखाता आपसमे बैर रखना.. याची खरी प्रचिती आल्याशिवाय राहत नाही…!
अमन आठ नऊ वर्षाचा असताना नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर त्याची आईव़डीलांशी ताटातूट झाली. एखाद्या चित्रपटाप्रमाणे हा प्रसंग होता. त्यानंतर नागपूरमधील चाईल्ड लाईन या संस्थेच्या बालसुधारग-हात त्याची रवानगी करण्यात आली. येथे त्याला नागपूरमधील दामले कुटुंबाने दत्तक घेतले. दामले कुटुंबात समर्थ दामले, त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगा व मुलगी अशा कुटुंबात नव्याने अमन स्थिरावला.
तो सध्या दहावीत शिकत असून त्याचे आधारकार्ड बनवताना अनेक अडचणी आल्या. आधारकार्ड बनवताना तांत्रिक अडचणी येत असल्याने अखेर आधार सेवा केंद्रातील तांत्रिक तज्ज्ञाची दामले कुटुंबाने भेट घेतली. तेव्हा हे छायाचित्र व नाव मोहम्मद अमीर याचे असल्याचे समोर आले.
मग पुन्हा प्रवास सुरू झाला तो म्हणजे अमनचे गाव शोधण्याचा.. जबलपूरमधील मोहम्मद आयुब हे त्याचे वडील आहेत हे समजल्यानंतर दामले कुटुंबाने जबलपूरच्या या कुटुंबाशी संपर्क साधला. या कुटुंबाने तातडीने नागपूर गाठले. सुरवातीला अमनने या कुटुंबाला काही ओळखले नाही, मात्र दामले कुटुंबाने त्याला समजावून दिले. इथेही चित्रपटाप्रमाणेच अवस्था होती.. मात्र एकंदरीत एका मुलाच्या आयु्ष्याला खऱ्या अर्थाने स्व गवसल्याने दोन्ही कुटुंबे समाधानी होती.











