पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यात दोन दिवसापूर्वी भारती हॉस्पिटल मधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बेडरूममध्ये छुपे कॅमेरे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्याचा तपास करताना पोलिसांनी आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला, ते म्हणजे अशा प्रकारचे कॅमेरे लावणारा दुसरा, तिसरा कोणी नसून त्याच परिसरातील नामांकित डॉक्टर सुजित बाजीराव जगताप (वय 42) हा असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलै रोजी पुण्यात हा प्रकार घडला होता. या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर भारती हॉस्पिटल मधील एका खोलीत मैत्रिणीसमवेत राहतात.
6 जुलै रोजी संध्याकाळी घरी आल्यानंतर फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर त्यांनी बल्ब लावला. मात्र हा बल्ब थोडासा वेगळा वाटल्याने त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलावून घेतले व बल्ब दाखवला. तेव्हा हा बल्ब नसून यामध्ये छुपे कॅमेरे असल्याचे इलेक्ट्रिशियनने सांगितले. त्यानंतर पीडित महिला डॉक्टरने पोलिसांकडे तक्रार केली होती.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि फिर्यादींसह यांना संशय वाटत असलेल्या व्यक्तींकडे चौकशी सुरू केली. तेव्हा सीसीटीव्हीमध्ये सुजित जगताप आढळून आले. पोलिसांनी जगताप यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी सदर गुहयाची कबुली दिली आहे. जगताप यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, सुजित जगताप परिसरातील नामांकित डॉक्टर असून एमडी आहे. त्याचा हिराबाग येथे मोठा दवाखाना आहे. भारती हॉस्पिटलमध्ये लेक्चर घेण्यासाठी देखील हा डॉक्टर जात होता. याच दरम्यान या महिला डॉक्टरचा रूम मध्ये छुपे कॅमेरे लावले असे पोलिसांनी सांगितले.











