अॅड. विजय सोनवणे : महान्यूज लाईव्ह
नगर – मराठवाड्यातील मुलांच्या तुलनेत मुलींचे कमी असलेले प्रमाण, यामुळे लग्नाच्या व्याख्या बदलल्या आहेत. वरपक्षापेक्षा वधुपक्षालाच अधिक महत्व आले असल्याने प्रसंगी मुलीकडच्यांनाच पैसे देऊन लग्न लागत आहेत.. मात्र यात धंदा शोधत गुन्हेगार घुसले असून बंटीबबलीचा धंदा खेळू लागले आहेत. असाच एक धंदा कर्जत पोलिसांनी नुकताच मोडीत काढला. (cheating in marriage, Karjat police inspector chandrashekhar yadav, arrested the gang)
‘लग्नासाठी मध्यस्थी करून आम्ही तुम्हाला थेट नवरीच उपलब्ध करून देतो…प्रसंगी मध्यस्थी हेच नवरीचे नातेवाईक होऊन लग्नासाठी लाखो रुपये आपल्या ताब्यात घेतात आणि लग्नसोहळाही पार पडतो.. मात्र 2 दिवसातच नवरी मात्र लघुशंका किंवा इतर कारण देऊन क्षणात पलायन करते. लग्नसंस्थेत घुसलेल्या अशा फसव्या टोळीचा प्रसंग सध्या अनेकांबाबत घडू लागला आहे. नुकतेच विदर्भात १३ लग्न केलेली बबली पोलिसांच्या हाती लागली होती. आता कर्जत पोलिसांनी असेच प्रकरण उघडकीस आणले आहे. कर्जत तालुक्यातील आखोणी गावातील युवकाच्या बाबतीत हा प्रकार घडला. मात्र कर्जतच्या पोलिसांनी या टोळीचा छडा लावत यातील आरोपींना जेरबंद करून फसवणुकीतील काही रक्कम हस्तगत करून ती फिर्यादीला मिळवून दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आखोणी (ता. कर्जत) येथील शुभम ( नाव बदलले आहे) याचे २९ वर्षे झाले तरी लग्न जमत नव्हते. तेव्हा या युवकाला परभणी जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील राजेंद्र वैजनाथ हिवाळे, हिंगोली जिल्ह्यातील विलास जिजरे आणि परभणी जिल्ह्यातील पोखणी येथील मंगलबाई दत्तराव वाघ हे तिघेजण भेटले. वास्तविक पाहता असाच त्यांचा सापळा असतो. त्या सापळ्यात अडकणाऱ्या युवकाला ते बरोबर हेरतात. त्यानुसार शुभमला त्यांनी गाठले आणि पल्लवी गोमाजी सकट (वय २० वर्षे. रा. मोहाला, ता सोनपेठ, जि. परभणी) या युवतीशी नाते असल्याचे सांगत तिचे लग्न तुझ्याशी लावतो असे सांगितले.
पल्लवी हिचे यापूर्वी तीन विवाह झालेले आहेत. मात्र तिच्या विवाहाची माहिती लपवून या तिघांनी पल्लवीचा व शुभमचा विवाह ठरवला. त्यानंतर गोड गोड बोलून काही व्यवहारीक बाबी सांगून त्याच्याकडून २ लाख रुपये व इतर खर्चासाठी १० हजार रुपये असे २ लाख १० हजार रुपये घेतले. मंगलबाई हिने पल्लवी ही आपली जवळची नातेवाईक असल्याचे सांगत लग्नाची तारीखही ठरवली व लग्नही लावून दिले. मात्र लग्न लावल्यानंतर खुशीत असलेल्या शुभमला दोन दिवसांतच या बनावट लग्नाचा हिसका बसला. लघुशंकेचे कारण सांगून पल्लवी जी पळून गेली, ती सापडलीच नाही..
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शुभमने पोलिस ठाणे गाठले. कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखऱ यादव यांना त्यांनी इत्थंभूत माहिती दिली. कर्जत पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत चारही आरोपींना शोधून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली व जी रक्कम शुभमकडून या चौघांनी घेतली होती, त्यातील ८० हजार रुपये हस्तगत केले. ते शुभमकडे सूपूर्तही केले.
अशा फसव्या टोळींपासुन सावध रहा!
चंद्रशेखऱ यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत – तरुणांचे विवाह रखडल्याचे हेरून लग्न लावून देणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. खोटी नाती भासवून व खरी माहिती लपवुन आर्थिक फसवणूक करून नवरीसह पलायन केले जाते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. तसा संशय आला तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.











