अकोला : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे आमदार आणि मुलुख मैदान तोफ अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आला असून, त्यांच्यावर आयकॉन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून भेटायला कोणीही येऊ नये असे त्यांनी व्हिडिओद्वारे आवाहन केले आहे.
मिटकरी यांनी स्वतःच आवाहन केले असून चिंता करण्यासाठी काही कारण नाही. माझी प्रकृती सुधारते आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणी मला भेटायला येऊ नये. कारण कोरोनाचा काळ आहे अशी विनंती मिटकरी यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी चर्चेत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विविध नेत्यांना अंगावर घेऊन ते जहरी टीका करत आहेत. त्यामुळे अमोल मिटकरी यांच्यावर भाजपचेही जास्तच लक्ष आहे. त्यात आजच मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांचे समर्थक चिंतेत आहेत. मात्र त्यांना नव्याने मिटकरी यांनी पाठवलेल्या व्हिडिओमुळे दिलासा मिळाला आहे.











