राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : तालुक्यातील दहिटणे येथील तलाठी आणि त्यांच्या सहाय्यकास 30 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडल्याची घटना ताजी असतानाच आता यवत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या केडगाव पोलीस चौकीतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना 8 हजार रूपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले आहे.
पोलीस शिपाई दादासो शिवाजी दराडे वय 26 आणि पोलीस नाईक रमेश काळे अशी या पोलीस कर्मचारांची नावे आहेत. शुक्रवारी ( दि.9) ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, यवत पोलीस स्टेशनमध्ये एका दाखल गुन्हयामध्ये तक्रारदार त्यांचे साडू भाऊ यांच्यावर तक्रारदाराचे नाव कमी करण्यासाठी 10 हजार रूपयांची लाच मागितली होती.
अशी तक्रार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. त्यानुसार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अलका सरग, शरद गोर्डे, पोलीस नाईक वैभव गोसावी, पोलीस शिपाई पूजा पागिरे आदींनी सापळा रचून पोलिसांना तडजोडीअंती 8 हजार रूपये घेताना पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.











