बारामती : महान्यूज लाईव्ह
काही दिवसांपूर्वीच बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ऐन उन्हाळ्यात विहीर खोदताना ४० फूटांवर जमीनीतून पाणी चार ते पाच फूट वर उंच उसळले होते. त्याचा व्हिडीओ देखील महान्यूज वर अपलोड केला होता. त्याला सहा लाखांवर हिटस मिळाल्या. काल बारामती तालुक्यात तर वेगळाच चमत्कार झाला आहे. तालुक्यातील कारखेल येथे एका ठिकाणी कोरड्या तळ्यात वीज कोसळली…अन काही वेळाने तेथील कोरडे तळे पाण्याने भरले… पूर्वीच्या काळी वीज पडली की, ती पाणी पिऊनच शांत होते अशी जी म्हण गावगाड्यात जुनी माणसं सांगायची, त्याची जणू प्रचितीच कारखेलमध्ये आली आहे.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता
कारखेल येथील कोरेश्वर मंदिराच्या परिसरात रात्री पावसाच्या दरम्यान वीज कोसळल्याने जमीनीतून पाणी उसळले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण रात्रीत येथील कोरडे पडलेले तळेही बऱ्यापैकी पाण्याने भरले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेथून अजूनही पाणी उसळत आहे. हे पाणी पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून लोक येत आहेत. दरम्यान गावचे सरपंच दादा चव्हाण व पोलिस पाटील सचिन पाटील यांनी हा प्रकार खरा असून आम्हीही याची माहिती घेत आहोत असे सांगितले.











