शीतल थोरात : महान्यूज लाईव्ह
दिल्लीच्या उत्तर भागातील समयपुर ठाण्यामधील महिला हेडकॉन्स्टेबल सिमा ढाका या महिलेचे हेडकॉन्स्टेबलवरून थेट सहायक फौजदारपदाचे प्रमोशन करण्यात आले. हे प्रमोशन का करण्यात आले? तर या महिलेने फक्त तीन महिन्यांमध्ये ठाण्याच्या अंतर्गत 76 बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध लावला.
दिल्लीचे पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी पोलीस मुख्यालयात बोलवून या महिला हेडकॉन्स्टेबलच्या स्टार मध्ये वाढ केली. असं काय काम केलं होतं सीमा ढाका यांनी? तर त्याचं असं झालं होतं की, आयुक्तांनी दिल्लीतील बेपत्ता मुलांचा शोध लावण्यासाठी एक योजना लागू केली होती. यामध्ये कोणताही कॉन्स्टेबल किंवा हेडकॉन्स्टेबल जर एका वर्षांमध्ये 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या 50 मुलांना शोधून काढेल, त्याला औट ऑफ टर्न प्रमोशन देण्याचे त्यांनी जाहीर केले.
फक्त यामध्ये एक अट होती की, पन्नास मुलांमधील किमान पंधरा मुलांची वयोमर्यादा ही आठ वर्षापेक्षा कमी असावी! सीमा ढाका यांनी हे आव्हान स्वीकारले आणि दिल्लीमधील विविध ठिकाणी विविध ठाण्यामधील बेपत्ता अशी नोंद असलेल्या लहान मुलांना बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणावरून शोधून त्यांना सुखरूप त्यांच्या आईबापांच्या ताब्यात दिले. नोव्हेंबर 2020 मध्ये सिमा ढाका यांचे हे अफलातून आऊट ऑफ टर्न प्रमोशन झाले..











