खंडाळा : महान्यूज लाईव्ह
कराड तालुक्यातील उत्तरमांड नदीच्या पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा केल्याबद्दल कोर्टी येथील गणेश मुकुटराव थोरात याच्याविरोधात उंब्रज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात कराड तालुक्यातील शिवडे येथील गावकामगार तलाठी पद्मभूषण शंकरराव जाधव यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 4 जुलै रोजी टिपर व जेसीबीच्या साह्याने हा वाळूउपसा झाल्याचे तलाठी जाधव यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी गणेश मुकुटराव थोरात याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी तलाठी जाधव यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून, चार जुलै रोजी रात्री जाधव यांना शिवडे गावातील रणजीत घाडगे पाटील यांचा फोन आला. त्यांनी नदीच्या बंधारा पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याचे सांगितले. त्यावरून तलाठी जाधव यांनी तेथे जाऊन पाहिले असता, नदीपात्रात शिवडे गावातील रणजीत संजय घाडगे पाटील यांनी फोनवरून माहिती दिली की, उत्तरमांड नदीच्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याच्या नदीपात्रातून जेसीबीचे साह्याने काही लोक वाळू उपसा करत आहेत. त्यानुसार या ठिकाणी गेल्यानंतर शिवडे गावातील संतोष चव्हाण, रणजीत घाडगे पाटील, आशुतोष माळी, दिनेश घाडगे, धनराज जांभळे व इतर लोक तिथे जमा झाले होते. त्यावेळी रणजीत यांनी वाळूचोरांनी नदीच्या पात्रातून जेसीबी व दोन डंपरच्या साह्याने वाळू काढली आहे, त्यांना वाळू करताना धनराज जांभळे यांनी पाहिले आहे असे सांगितले.
धनराज जांभळे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सायंकाळी आठच्या सुमारास मसूर फाटा येथून उंब्रज कडे जात असताना नदीपात्रात एक जेसीबी व दोन टिपर वाळू काढताना दिसल्याने त्या ठिकाणी जाऊन टिपरच्या समोर असलेल्या अनोळख्या व्यक्तीकडे विचारणा केली असता, त्यांनी सदरची वाळू हे हायवेचे काम सुरू असल्याने काढली जात असल्याचे सांगितले व तो अर्धा टिपर घेऊन व जेसीबी घेऊन निघून गेला अशी माहिती दिली.
यानंतर या माहितीवरून तलाठी जाधव यांनी अधिक चौकशी केल्यानंतर गणेश थोरात (रा. कोर्टी ता. कराड) याने वाळू उत्खनन करून वाळू चोरून नेल्याची निदर्शनास आले. त्यामुळे गणेश मुकुंदराव थोरात (रा. कोर्टी ता. कराड) याने जेसीबी व दोन टिपरच्या साह्याने वाळू चोरी केली व 4 हजार 200 रुपयांचे शासकीय नुकसान केले आहे, अशी फिर्याद तलाठी पद्मभूषण शंकरराव जाधव यांनी दिली. त्यावरून वरील गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आसिफ जमादार करत आहेत.











