राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : गावकामगार तलाठयासह डमी तलाठीही लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. 30 हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले. दौंड तालुक्यातील दहिटणे येथील ही घटना!
दौंड तालुक्यातील दहिटणे गावचे गावकामगार तलाठी आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे सहकारी अर्थात डमी तलाठी भाऊसाहेब यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 30 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ही माहिती यवत पोलीसांनी दिली.
दरम्यान, तलाठ्याला लाच घेताना पकडल्याची माहिती समजताच महसूल विभागात खळबळ उडाली. दहिटणे गावच्या या लाचखोर तलाठ्याचे नाव कुंडलिक नामदेव केंद्रे ( वय 36 दहीटणे, ता. दौंड,जि. पुणे) असून डमी भाऊसाहेब हा शंकर दत्तू टुले ( वय.33 रा. मिरवडी, ता.दौंड, जि.पुणे ) आहे. या दोघांनाही अटक केली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार शेतकऱ्याने त्याच्या सातबारा भोगवटा वर्गात बदल करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र तलाठी कुंडलिक केंद्रे याने 35 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्याबाबत संबंधित शेतकऱ्याने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज बुधवारी ( दि.7) दहिटणे येथील तलाठी कार्यालयात त्याची पडताळणी करीत सापळा रचून तडजोडीअंती 30 हजार रुपयांची लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत सांळुखे, पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस शिपाई भुषण ठाकूर, अकुंश आंबेकर, पांडुरंग माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत यवत पोलीस स्टेशनला लाचलुचपत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.