शुभम गायकवाड : महान्यूज लाईव्ह
पिंपरी-चिंचवड : चौधरी पार्क दिघी येथे तुमच्या घरात भूत आहे, तुम्ही पोर्णिमेच्या आत मरून जाणार, असे सांगून तीन व्यक्तींनी महिलेवर जादूटोणा केला आहे. या महिलेला करणीच्या नावाखाली पट्ट्याने मारून जिभेला आणि ओठांना अगरबत्तीने चटके दिले. यावेळी महिलेकडून 35 हजार रुपयांची मागणी केली. यानंतरही महिलेला चाकूचा धाक दाखवून सतत पैशाची मागणी हे आरोपी करत होते.
या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. गौरव गणपत भोईरे ( वय 19, रा. नेवासा फाटा, जि. नगर), तुषार, अँशली जोसेफ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना 19 जून ते 1 जुलै या कालावधीत घडलेली आहे. या आरोपींविरोधात पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात सोमवारी ( दि. 5) रोजी फिर्याद दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा तपास घेत आहेत.
पीडित महिलेला 1 वर्षापासून आजारी होती. त्यामुळे त्यांना बाहेरची करणी झाल्याचा संशय वाटत होता. पीडित महिलेने ही बाब तिच्या बहिणीच्या मुलगा आरोपी गौरव याला सांगितली. यानंतर, आरोपी गौरव याने आपल्या दोन मित्रांना पीडित महिलेच्या घरी आणले. तुमच्या घरात भूत आहे आणि तुम्ही पोर्णिमेच्या आत मरून जाणार असे सांगून पीडित महिलेला हॉलमध्ये बसवून आजूबाजूला हळद-कुंकू टाकले. आरोपी तुषारने महिलेला पट्ट्याने हातावर आणि पाठीवर मारून जखमी केले. आरोपी अँशली जोसेफ याने पीडित महिलेच्या शरीरावरून लिंबू उतरून अगरबत्तीने ओठांना आणि जिभेला चटका दिला. पीडित महिलेला अगरबत्तीचा धुर नाकामधून ओढण्यास सांगितले.
यानंतर महिलेकडून आरोपीने 35 हजार रुपये घेतले. त्यानंतरही महिलेला सतत फोन करून पैशाची मागणी आरोपी करीत होते. 1 जुलै रोजी आरोपी अँशली जबरदस्तीने पीडित महिलेच्या घरी येऊन चाकूचा धाक दाखवत 1 हजार रुपये घेऊन गेला. या पीडित महिलेला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. सदर आरोपींवर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.