by Shubham Gaikwad, Mahanews.Live
आपल्याकडे चोरी झाली की, पहिल्यांदा आपल्याला कोणाचे नाव आठवते?… अर्थातच पोलिसांचे..! पण पोलिसाचीच चोरी झाली तर ?…. मध्य प्रदेशातील एका पोलिस अधिकाऱ्याच्या घरात चोरी झाली आहे. मंगळवारी त्यांच्या घरात ही चोरी झाली आहे. या पोलिस अधिकार्याचे नाव कमलेश कटारे असून ते मध्यप्रदेशच्या भिंड जिल्ह्याचे रहिवासी आहेत. कमलेश कटारे हे छत्तीसगड पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर आहेत. धक्कादायक बाब म्हणजे चोराने चोरी करून चिठ्ठी लिहून पैसे परत करण्याचे वचन दिले आहे.
मंगळवारी कटारे हे छत्तीसगडमध्ये ड्युटीवर होते. कटारे यांच्या पत्नीने घराला कुलूप लावून मुलांसह माहेरी गेल्या होत्या. याचा फायदा साधून चोराने त्यांच्या घरात चोरी केली. दुसऱ्या दिवशी कटारे यांच्या पत्नी त्यांच्या मुलांसह घरी आल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील दागिने आणि पैसे चोरीला गेले होते. यावेळी त्यांच्या पत्नीला चोराने लिहिलेली चिठ्ठी सापडली.
या चिठ्ठीमध्ये चोराने लिहिले होते की, “मित्रा सध्या खूप कठीण परिस्थिती आहे. माझ्या मित्राचे निधन झाले आहे त्यामुळे मला पैशांची गरज आहे. तुम्ही कसलीच काळजी करू नका. मला पैसे मिळाल्यावर मी तुमचे पैसे परत करीन.” असे चोराने चिठ्ठीमध्ये लिहिले होते. या चिठ्ठीमध्ये चोराने ‘धूम 3’ असे लिहून “दिल से अच्छा हू” असे खाली लिहिले आहे. दरम्यान पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. कटारे कुटुंबीयांना चोर पैसे परत करेल अशी आशा वाटत आहे.