बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव येथील राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणी तावरे यांनी दिलेल्या जबाबानंतर माजी सरपंच जयदिप दिलीप तावरे यांना पोलिसांनी अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ उद्या (ता.८) माळेगाव बंद पुकारण्यात आला आहे. अर्थात हा बंद कोणी पुकारला आहे, त्याचे नाव मात्र जाहीर करण्यात आले नाही.
यासंदर्भात माळेगावमधील सोशल मिडियावरून राष्ट्रवादीच्याच समर्थकांकडून ही बंदची पोस्ट फिरवली जात आहे. त्यामुळे या गोळीबार व नंतरच्या घटनांवरून राष्ट्रवादीमध्येच दोन गट पडले असल्याची चर्चा आहे. दरम्यान यामध्ये माळेगाव बुद्रुक राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदिप दिलीप तावरे यांच्यावर खोटी फिर्याद दिल्याबद्दल फिर्यादीचा जाहीर निषेध व माळेगाव बंदचे आवाहन असा मजकूर असून यामध्ये गुरूवारी सकाळी नऊ वाजता राजहंस चौकात यासंदर्भात निषेध सभा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खोटी फिर्याद देऊन ही अटक झाली असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान परवा रात्री जयदिप तावरे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. यासंदर्भात रविराज तावरे यांनी दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घटनेसंदर्भातील मागील काही दिवसा्ंतील घडामोडींसदर्भात जबाब दिला होता. त्यामध्ये या घटनेत जयदिप तावरे यांचाही सहभाग असल्याचे त्यांनी नमूद केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. दुसरीकडे आणखी काही संशयितांचे फोन वरील संभाषणही दिले असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे.