दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वासुंदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीने पोषण आहारासंदर्भात ठराव केला. व्यवस्थित पोषण आहार मिळत नसल्याने हे काम इतरांना देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र मुख्याध्यापकाने या ठरावाचे प्रोसेडिंग केले नाहीच, मात्र पोषण आहार देणाऱ्या महिलेने शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षालाच अरेरावीची भाषा केली. मुख्याध्यापक स्थानिक गावातील असल्याने यात राजकारण होत असून मुख्याध्यापिकेच्या हलगर्जीपणामुळे कामात मनमानी होत असल्याची तक्रार दौंडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी श्री. वणवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात लेखी तक्रार मिळाली असून त्यासंदर्भात मुख्याध्यापकास नोटीस बजावली जाणार आहे, तसेच आपण स्वतःही या ठिकाणी भेट देणार असल्याचे सांगितले.
पालकांना आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने कामकाज होत असल्याने मुख्याध्यापकांची चौकशी करून कारवाई करावी, मुख्याध्यापिका स्थानिक रहिवासी असल्याने स्थानिक राजकारणात त्या भाग घेत असल्याने त्यांची इतरत्र बदली करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन हाजबे यांनी दौंड गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, वासुंदे येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीची सभा 21 जून रोजी पार पडली. या बैठकीत चौथा विषय हा पोषण आहाराचा होता. पोषण आहाराचे काम सध्याच्या पोषण आहार देणाऱ्या व्यक्तीशी कोणताही करार नसल्याने नियमानुसार इतर व्यक्तींना देण्याचे ठरले. २१ जून रोजी झालेल्या या बैठकीचे मुख्याध्यापिकेने मात्र प्रोसेडिंगच लिहीले नाही, या उलट यापूर्वी जी महिला पोषण आहाराचे काम करीत होती, त्या महिलेचा कसलाही करार नसताना तिला पाठीशी घालून शालेय व्यवस्थापन समितीविरोधात शिवीगाळ करण्यास फूस दिली जात असल्याचीही तक्रार यामध्ये करण्यात आली आहे. यातूनच संबंधित महिलेने शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्या्ंशी अरेरावी केली व दमदाटी केली.
मुख्याध्यापीका या स्थानिक रहिवाशी असून स्थानिक राजकारणात भाग घेत आहेत. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत असून गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहे, म्हणून ते अधिक प्रमाणात दिसलेले नाही, मात्र अशा राजकीय व्यक्तीशी संबंधित मुख्याध्यापक असल्याने शाळा समितीच्या ठरावांना न जुमानता मुद्दाम मनमानी कारभार करीत असल्याने त्यांची तातडीने इतरत्र बदली करावी ,अथवा मुख्यालयात रुजू करावे अशी मागणीही हाजबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, याबाबत दौंड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी वणवे यांना विचारले असता ते म्हणाले की, याबाबत लेखी तक्रार प्राप्त झाली असून संबंधित मुख्याध्यपक यांना नोटीस बजावण्यात येणार आहे, मी स्वतः शाळेला भेट देवून या प्रकाराची माहिती घेवून पुढील कारवाई केली जाईल. तर या शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला जगताप यांना विचारले असता आता माझ्याकडे अधिकारी आले आहेत. मिटींग मध्ये आहे, नंतर फोन करते असे बोलत अधिक बोलण्याचे टाळले.