दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वासुंदे येथील गुरुकृपा माध्यमिक विद्यालयास नुकताच माध्यमिक ते उच्च माध्यमिक असा दर्जा मिळाला आहे. या विद्यालयात इयत्ता अकरावी आणि बारावी साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेला राज्य शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे. तसे पत्र महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे कक्ष अधिकारी प्रदीप पडोळे यांनी विद्यालयास दिले आहे.
ही माहिती विद्यालय व्यवस्थापकांनी दिली. दरम्यान, या विद्यालयात तीनही शाखेची मान्यता मिळावी यासाठी आमदार राहुल कुल यांनी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. गुरूकृपा माध्यमिक विद्यालयात सध्या इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण परिसरातील विद्यार्थी घेत आहेत. पुढील शिक्षणासाठी या भागातील अनेक विद्यार्थांना दौंड, पाटस, वरवंड, बारामती, पुणे या शहरात जावे लागत होते. परिणामी शाळेची फी, शैक्षणिक खर्च, प्रवास यामुळे अनेक शेतकरी कुटूंब आमि गोरगरीब विद्यार्थांना आर्थिक अडचणी येत असल्याने अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहत होते.
विशेषत: अनेक पालक आपल्या मुलींना बाहेर गावी शिक्षण घेण्यासाठी टाळटाळ करीत असल्याने अनेक विद्यार्थिनींना पुढील शिक्षण घेता आले नाही. यामुळे शहराप्रमाणे ग्रामीण भागातही किमान बारावीपर्यंत सर्व शाखेंचे शिक्षण मिळावे अशी अपेक्षा पालकांची आणि विद्यार्थांची होती, ती यानिमित्ताने पूर्ण होणार आहे.
याचीच दखल घेत गुरूकृपा माध्यमिक विद्यालयाच्या संचालक मंडळाने शालेय शिक्षणाचा दर्जावाढ करण्याचा निर्णय घेऊन तशी मागणी राज्य शिक्षण मंडळाकडे केली. आमदार राहुल कुल यांना ही याबाबत मागणीचे निवेदन दिले होते. आमदार कुल यांनी सदरचा प्रस्तावास तात्काळ मंजूर मिळावी यासाठी राज्यशासनाच्या शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाने गुरूकृपा माध्यमिक विद्यालयाला दर्जावाढ करीत माध्यमिक ते उच्च माध्यमिक असा दर्जा मंजुर केला.
तसेच इयत्ता अकरावी आणि बारावीचे सर्व शाखा सुरू करण्याची ही मान्यता दिली आहे. यामुळे इयत्ता दहावीच्या पुढील विद्यार्थांना आता याच विद्यालयात पुढील शिक्षण घेता येणार असल्याने पालक आणि विद्यार्थांनी समाधान व्यक्त केले.