राज्य व केंद्रातील ट्विटरवॉरने रोगापेक्षा राजकारणाचे महत्व अधोरेखित
मुंबई : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या लढाईत माणसांचे जगणे हरवून गेले असले तरी राजकारण मात्र सोयीसोयीने सुरूच आहे. मजूर आणि रेल्वेवरून गेले काही दिवस सुरू असलेला वाद आता राज्य सरकार व केंद्र सरकारदरम्यान सुरू झाला आहे. राज्यातून मजूरांसाठी विशेष ट्रेन्स मिळत नाहीत म्हणताच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी १२५ रेल्वे देतो, एका तासांत मजूरांच्या याद्या द्या असे फर्मान सोडले..आणि तासानंतर पुन्हा ट्विट करीत याद्याच मिळाल्या नसल्याचे सांगून राज्य सरकारला कोंडीत पकडले..त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने एका तासाच्या आत १२५ ट्रेन्स साठीच्या मजूरांच्या याद्या रेल्वे खात्याला दिल्याचा दावा केला. त्यात खासदार संजय राऊत यांनी उडी घेत मजूरांची यादी दिलीय, फक्त भलत्याच स्टेशनवर रेल्वे पाठवू नका असा अनाहूत सल्ला पियूष गोयल यांना देत वादाला तोंड फोडले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना घडोघडी कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरूच आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील थेट आरोप न करता अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारवर तोंडसुख घेत असल्याने भाजप नेते वैतागले आहेत. एकीकडे केंद्र सरकार मदत करीत असल्याचे सांगतानाच मदत पोचली नसल्याचेही महाविकासआघाडीचे मंत्री सांगू लागल्याने भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला जागा दाखवून देण्यास सुरवात केली आहे. त्याची पहिली ठिणगी वरिष्ठ स्तरावर रेल्वेमंत्री पियूष गोयल व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यादरम्यान पडली.
श्रमिकांच्या विशेष रेल्वेवरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्राची तयारी आहे, मात्र रेल्वे मंत्रालय कमी रेल्वे पाठवत असल्याची तक्रार केली. गोयल यांना हे पटले नाही, मुख्यमंत्र्यांची टिका त्यांच्या वर्मी लागली. त्यांनी १२५ ट्रेन लगेच सोडतो, फक्त मोकळ्या, रिकाम्या पाठवू नका आणि एका तासात मजूरांची यादी द्या असा टोला लगावला. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेची व्यवस्था केल्यावरून गोयल यांचे आभार मानले.
त्यावर मग शिवसेनेकडून त्यांचे फिल्ड मार्शल खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली. त्यांनीही गोयल यांना टोला लगावला. राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयास गाड्यांची यादी दिलीय, गोयलजी फक्त एक विनंती आहे की, रेल्वे ज्या स्थानकावर पोचायला हवी, तिथेच पोचावी. दरभंगाला सोडलेली गाडी कर्नाटकात पोचू नये, उत्तर प्रदेशसाठी सोडलेली रेल्वे ओरीसात जाऊ नये म्हणजे मिळवली असे ट्विट राऊत यांनी केले.
त्य़ावरून पियूष गोयल यांनी लागलीच ट्विट करीत एक तास झाल्याचे सांगून अजूनपर्यंत महाराष्ट्राने श्रमिकांची यादी दिली नाही असा टोला लगावला. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने लागलीच त्याचे खंडन करीत एक तास होण्यापूर्वीच रेल्वे मंत्रालयाला यादी पाठवलीय, तपासून घ्यावी असा सल्ला दिला.
या साऱ्या ट्विटवॉरमध्ये मात्र संकटाच्या काळातही राजकारण्यांना सुचणारे राजकारण आणि सामान्यांचे होणारे हाल याची चर्चा मात्र दिवसभर रंगली..










