विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : सोन्याच्या दुकानाचे शटर उचकटून तीन अज्ञात चोरट्यांनी सुमारे २७ हजार ५०० रुपये किंमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. ०६ ) सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. वरील सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
याप्रकरणी ओम राजेंद्र वर्मा (वय ३४, रा.त्रिमुर्ती चौक, लोणी काळभोर ) यांनी अज्ञात तीन चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, ओम वर्मा यांचे लोणी काळभोर गावात ओम धनेश ज्वेलर्स या नावाने सोन्याचे दुकान आहे. वर्मा हे त्यांच्या कामानिमित्त सोमवारी (ता. ०५) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून गेले होते.
ओम यांची चुलती सविता वर्मा या वॉकिंगसाठी मंगळवार (ता. ०६) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दुकानासमोरून जात असताना, त्यांना दुकानाचे शटर हे उचकटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी ओम यांना फोन करून सदर घटना सांगितली. त्यानुसार ओम वर्मा हे दुकानाजवळ गेले. त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याने त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता, चांदीच्या वस्तू चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, दुकानातील असलेले सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तिघे दुकानाचे शटर उचकटून चांदी व रोख रक्कम चोरी करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ओम वर्मा यांचे मित्र योगेश जवाहरलाल शर्मा (वय २७, रा. नेहरू चौक) यांचे साई मारवन्स टेलीकॉम नावाचे मोबाईलचे दुकान फोडले असल्याचे कळाले. त्यावेळी तिघांनी दुकानाचे सेंन्टरलॉक तोडून मोबाईल व इतर रोकड चोरून नेली. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर करीत आहेत.