शीतल थोरात : महान्यूज लाईव्ह
कराड : विवाहितेला मारहाण करून तिला जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे कराड तालुक्यातील कालेटेक येथे घडली. हिना सर्फराज शेख (वय 25 रा. कालेटेक ता. कराड) या महिलेने कराड ग्रामिण पोलिसात तक्रार दाखल केली दिली असून, याप्रकरणी सासू, पती, दिरावर गुन्हा नोंद झाला आहे.
हिना शेख यांचा विवाह 2015 मध्ये सर्फराज शेख याच्याशी झाला असून, वारंवार भांडण होत असल्याने त्या एक वर्षापूर्वी माहेरी राहत होत्या. 4 जून रोजी पती सर्फराज शेख याचा त्यांना फोन आला आपण दोघेही स्वतंत्र राहू असे म्हणत त्याने हिना यांची समजूत काढल्याने त्या भावाबरोबर सासरी गेल्या.
त्याचदिवशी रात्री पुन्हा सासरच्या लोकांनी हिनाशी वाद घालण्यास सुरुवात केली. सासू व पतीने मारहाण करत तुला इथे रहायचे असेल, तर आमच्या मनाप्रमाणे रहावे लागेल असे सांगत हिनाला घराच्या बाहेर ढकलून देत शिवीगाळ केली. त्यानंतर हिनाला पकडून नाक दाबत तिला विषारी औषध पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दरम्यान, हिना यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन करून ही घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून, इतर नातेवाईकांच्या साहाय्याने रूग्णवाहिका बोलवून हिनाला खासगी रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी हिना शेखने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी सासू, पतीसह दिरावर गुन्हा दाखल केला आहे.