दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील दोन युवकांच्या हत्याकांडातील अटक केलेल्या आरोपींना दौंड न्यायालयाने पाच दिवसांची (10 जुलै ) पर्यंत पोलीस कोठडीत दिली.
ही माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.दरम्यान, या हत्याकांडातील उर्वरीत सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी, हा तपास निःपक्षपातीपणे करावा, अन्यथा आंदोलन करू अशा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशध्यक्ष दौलत शितोळे यांनी ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
पाटस येथे रविवारी (दि.4) शिवम संतोष शितकल (वय 23), गणेश रमेश माखर (वय २३ ) दोघेही रा. पाटस (अंबिकानगर ता.दौंड.जि.पुणे,) या दोन युवकांची काढ्या,तलवारीने वार करून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी आठ जणांवर यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेतील महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय २२ रा.पाटस, तामखडा ता.दौंड जि.पुणे ) महेश मारुती टुले (वय २० रा.पाटस, तामखडा ता.दौंड जि.पुणे ) ,युवराज रामदास शिंदे (वय १९ रा.गिरीम, मदनेवस्ती ता.दौंड जि.पुणे ) , गहिनीनाथ बबन माने (वय १९ रा.गिरीम, राघोबानगर ता.दौंड जि.पुणे ) या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारामती परिसरात अटक केले होते.
या चार आरोपींना दौंड न्यायालयात आज (दि.6 ) हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची म्हणजेच 10 जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली. ही घटना गंभीर असून या घटनेचा निपक्षपणे तपास सुरू आहे. या घटनेतील उर्वरीत आरोपींनाही लवकच अटक केले जाईल. अशी माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.