संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार तालुक्यातील सुलतानपूर व परिसरातील हजारो शेतकरी आणि व्यावसायीक खातेदार यांचे व बँकेचे हित लक्षात न घेता स्थानिक सेंट्रल बँक शाखा दुसरीकडे स्थलांतरीत केल्याने मागील दिड ते दोन महीन्यापासून लिंक फेलच्या नावाखाली व्यवहार ठप्प आहेत.
याबाबत अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी देवून देखील कोणताच परिणाम न होता उलटपक्षी बँकेत जाणारे शेतकरी, जेष्ठ नागरीक, व्यवसायीक आणि निराधार व्यक्तींना बँकेचे कर्मचारी लींक फेल कारण देत आहेत.
यामुळे शाखेतील व्यवहार तात्काळ सुरु करण्यात यावे अशी तक्रार एका निवेदनाद्वारे क्षेत्रीय प्रबंधक अकोला यांचेकडे गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे . ३ जूलै रोजी देण्यात आलेल्या सदरच्या निवेदनात असेही म्हटले आहे की, शाखाधिकारी यांचा बँकेच्या कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने बँकेत येणाऱ्या नागरीकांना हे कर्मचारी छोटी मोठी कारणे पुढे करून त्रास देऊन त्यांना उद्धटपणाची वागणूक देतात .
बँक सुरु व बंद करण्याची तसेच कामकाजाची नियमीत वेळ न ठेवता मनमानी केली जाते. बँकेची एटीएम सुविधा देखील दोन महीन्यापासून बंद आहे. बँकेचे स्टेटमेंट वेळेवर दिले जात नाही. नेहमीच प्रिंटर बंद असल्याचा बहाणा करुन पासबुक अपडेट करण्यास मुद्दाम टाळाटाळ केली जाते. असे नमूद केले असून सदर निवेदनाच्या प्रती अग्रणी बँक अधिकारी तथा लोणार तहसिलेदार यांना पाठवल्या आहेत.
त्यावर दामोदर लाहोटी, विजय खोलगडे, सुरेश सुरुशे, विठ्ठल ढोले, तुळशिदास धुडकेकर, भारत जुमडे, तानाजी भानापूरे, कैलास जुमडे, गजेंद्र रत्नपारखी, खाजा शेख उमर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जिवन गाडेकर, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक शाखा सुलतानपूर : व्होडाफोनचे सर्वर जोडून झाल्यास बँकेचे व्यवहार लवकरच सुरळीत केले जातील. बँकेतील कर्मचाऱ्यांकडून खातेदारांना दिल्या जाणाऱ्या त्रासाबाबतची तक्रार वरीष्ठांना कळवली जाईल “