पुणे : महान्यूज लाईव्ह
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या तिसऱ्या युनिटने माळुंगे चौकी चाकण पोलीस ठाणे येथील दरोडा आणि जबरी चोरीचे पाच गुन्हे उघड केले असून दोन लाख 12 हजार रुपयांचे महागडे मोबाईल जप्त केले आहेत.
या प्रकरणी संशयित आरोपी विष्णू आनंदा नरवाडे (वय 21 वर्ष राहणार मरकळ रोड संतोषी माता रोड आळंदी इंगवले मठाजवळ आळंदी, सध्या राहणार कुरुळी तालुका खेड जिल्हा पुणे), कृष्णा बाळासाहेब सोनवणे (वय 20 वर्ष रा. कुरूळी, सुतार आळी ता. खेड जि. पुणे), आकाश कैलास ठोसर (वय 20 वर्ष रा. कुरूळी, सुतार आळी ता. खेड जि. पुणे) तसेच एक अल्पवयीन मुलगा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
30 जून 2019 रोजी कुरुळी फाटा परिसरामध्ये अनोळखी पाच दरोडेखोरांनी स्त्याने चालणार्या व्यक्तींना आडवून त्यांच्याकडील आयफोन कंपनीचे मोबाईल व सॅमसंग कंपनीचे मोबाईल कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून जबरदस्तीने चोरून नेले होते. यासंदर्भात म्हाळुंगे पोलीस दूरक्षेत्रात शस्त्रास्त्र विरोधी कायद्यासह वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता.
पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा एक व शाखा युनिट-3 यांच्याकडील पोलीस अधिकारी व आमदारांच्या वेगवेगळ्या पथकाद्वारे याचा तपास सुरु करण्यात आला होता. गुन्हे शाखेतील युनिट 3 मधील पोलीस निरीक्षक शंकर बाबर, फौजदार प्रसन्न जराड, अंमलदार यांच्यासह या ठिकाणी भेट देऊन सुधीर हिरेमठ यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार व गुन्हा करण्याच्या पद्धतीनुसार आंबेठाण चाकण येथून फौजदार प्रशांत जराड यांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे अधिक चौकशीत त्यांनी दरोड्याची माहिती दिली. त्यामध्ये या गुन्ह्यांमध्ये मुख्य सूत्रधार हा विष्णू नरवाडे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिस विष्णू नरवडे त्याचा शोध घेत होते.
फौजदार प्रसन्न जराड, पोलीस शिपाई श्री हनुमंते, ढाकणे यांना कुरुळी फाटा येथे विष्णू नरवाडे हा पुण्यातील मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून सापळा रचून वरील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 मोबाईल व गुन्ह्यात वापरण्यात आलेला एक लोखंडी कोयता असा दोन लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांनी एकूण पाच गुन्हे केल्याची देखील या तपासादरम्यान निष्पन्न झाले.
ही कारवाई पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर बाबर, फौजदार प्रसन्ना जराड, अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठ्ठल सानप, गंगाराम चव्हाण, राजकुमार हनुमंते, त्रिनयन बाळसराफ, प्रमोद ढाकणे, राहुल सूर्यवंशी, महेश भालचीम, सागर जैनक, शशिकांत नांगरे, योगेश्वर कोळेकर, गजानन आगलावे यांच्या पथकाने केली.