लोणी काळभोर : महान्यूज लाईव्ह
विकृती किती खालच्या थराला पोहोचली आहे, याचे उदाहरण देणारे घटना काल हवेली तालुक्यातील मंतरवाडी येथे घडली. चार वर्षाच्या चिमुकलीला कुरकुरे देण्याच्या बहाण्याने मनुकुमार मनोज सिंग (वय 23 रा. सध्या मंतरवाडी, हवेली) या नराधमाने अत्याचार केला. 3 जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही विकृत घटना घडली.
याप्रकरणी पिडीत चिमुकलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे आई-वडील आणि लहान भाऊ हे मंतरवाडी (ता. हवेली) येथील एका इमारतीच्या सदनिकेत भाडेतत्वावर राहतात. या मुलीचे वडील एका खाजगी कंपनीत चालक म्हणून काम करतात.
अल्पवयीन मुलीचे वडील नेहमीप्रमाणे शनिवारी (ता. ०३) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कामाला गेले. अल्पवयीन मुलीची आई दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरातील भांडी घासत होती. त्यावेळेस ही भावंडे घराबाहेर असलेल्या पोर्चमध्ये खेळत होते. मुलीच्या आईने थोड्या वेळाने तिला आणि तिच्या लहान भावाला आवाज दिला. परंतू काहीच प्रतिसाद आला नाही. मुलीच्या आईने बाहेर जाऊन पहिले असता, पोर्चमध्ये फक्त मुलगाच दिसला.
बराच वेळ मुलगी न दिसल्याने आईने इमारतीमध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा छोटी मुलगी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली येताना दिसली. मुलगी रडत होती. त्यामुळे आईने तिला जवळ घेऊन विचारले असता, वरच्या अंकल ने कुरकुरे दिले आणि त्यांच्या घरात नेले असे सांगत तिने आईला सर्व घटना कथन केली. तेव्हा तिच्या आईला धक्का बसला.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने मनुकुमार मनोज सिंग याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचार करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित चिमुकलीला उपचारासाठी पुण्यातील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहेत.