राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : फोनवरून शिव्यागाळ का केली म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांची काढ्या, तलवारी आणि डोक्यात दगड घालून निघृण हत्या करण्यात आली. दौंड तालुक्यातील पाटस येथील तामखडा येथील भानोबा मंदीरासमोर रविवारी (दि.4) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाले आहेत. या घटनेमुळे रात्रीपासून पाटस मध्ये तणावाचे वातावरण आहे.
शिवम संतोष शितकल (वय 23) गणेश रमेश माखर (वय २३ ) दोघेही रा. पाटस (अंबिकानगर ता.दौंड.जि.पुणे,) असे खुन झालेल्या युवकांची नावे आहेत. याप्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत महेश टुले दोघे रा.पाटस (तामखंडा ) , योगेश शिंदे ( रा. गिरिम ता.दौंड जि.पुणे )व इतर चार ते पाच अनोळखी इसम नाव (पत्ता माहीत नाही) अशी या आरोपींची नावे असून ते पसार झाले आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शिवम शितकल आणि गणेश माखर यांना मन्या उर्फ महेश संजय भागवत यांच्या सोबत फोनवरून आई आणि बहिणीवर विनाकारण शिव्या दिल्या, शिव्या का दिल्या असा जाब विचारायला गेले असता आरोपींनी त्यांना काठ्या व तलवार आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. याबाबत अर्जुन संभाजी माखर ( वय १९ रा.पाटस ) याने यवत पोलीस स्टेशला फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे घटना स्थळी दाखल झाले. दरम्यान, पाटस मध्ये रात्रीपासून तणाव निर्माण झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
काल दौंड मधील स्वप्निल लोणकर या एम पी एस सी उत्तीर्ण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर दौंड पुन्हा या दोन भीषण हत्याकांडाने हादरले. सलग दुसऱ्या दिवशी दौंड तालुक्यात या घटनांमुळे तणावाचे वातावरण आहे.