बारामती : महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील काऱ्हाटी हद्दीत काही दिवसापूर्वी हॉटेल सुरू झाले… पण सरकारचे कोरोनाचे निर्बंध लागू असल्याने हॉटेलमधून फक्त पार्सल मिळेल असे त्यांनी सांगितले.. आपल्याच गावात हॉटेल सुरू होते आणि आपल्यालाच हॉटेलमध्ये बसू देत नाहीत, म्हटल्यावर भावाचा इगो हर्ट झाला.. मग वेटर आणि त्याच्यात तुतूमैमै झाली.. मालकाने मध्यस्थी करत समजूत काढली.. मालक घरी गेला आणि त्यानंतर मात्र भावाने सगळ्या भावांचे तुफान हॉटेलवर आदळले आणि सुरू झाला सिनेस्टाईल राडा..!
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता..
काल रात्री बारामती तालुक्यातील काऱ्हाटी च्या मल्हार राज हॉटेलवर झालेल्या या सिनेस्टाईल या संदर्भात मोरगाव पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत हॉटेलमधील मॅनेजरला जबर मारहाण करण्यात आली. हॉटेलमधील संगणक, शीतपेय बाटल्या डोक्यात घालून फोडण्यात आल्या.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी, काल संध्याकाळी पाच वाजता जळगाव कडेपठार येथील एक जण या हॉटेलमध्ये आला. त्यावेळी हॉटेलमध्ये वेटरने सरकारच्या नियमानुसार आम्ही सध्या फक्त पार्सल देत आहोत असे सांगितले. त्याला हॉटेलमध्ये बसून जेवायला मिळणार नाही या उत्तराने त्याचा संताप झाला. त्याच्यात आणि वेटरमध्ये या विषयावरून बाचाबाची झाली. त्यावर हॉटेलच्या मालकाने मध्यस्थी करत या युवकाची माफी मागितली व समजून घ्यावे अशी विनंती केली.
त्यानंतर हा युवक शांत झाला व तो निघून गेला. संध्याकाळी सहा नंतर मालक घरी गेल्यानंतर रात्री आठ वाजता संबंधित युवकाने आपल्या सोबत परिसरातील दहा अकरा जणांना आले होते. त्यांनी बंद हॉटेलमधील मॅनेजरला हाक मारून गेटवरून उडी मारून आतमध्ये प्रवेश केला व थेट मारायला सुरुवात केली. दिसेल ती वस्तू फोडत संगणक संगणकाची स्क्रीन मॅनेजरचे डोक्यात घातली, तसेच मॅनेजरला दगडाने मारहाण केली.
हॉटेलमध्ये केलेल्या या हाणामारीचा प्रकार घडल्यानंतर मॅनेजर ला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज हॉटेलच्या स्वप्निल राजेंद्र गायकवाड या मॅनेजरने मोरगाव पोलिसांकडे फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी इंद्रजीत सोनवणे, नितिन खोमणे व त्याच्या अन्य 10 साथीदारांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास मोरगाव पोलिस करत आहेत.
उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून तातडीने दखल
दरम्यान घडलेल्या या घटनेनंतर आज दुपार पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. तो दाखल होऊ नये, यासाठी काही जण मध्यस्थी करत होते, मात्र सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ पाहून उपमुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने यात लक्ष घातले व जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घालून या संदर्भात सूचना केली. त्यानंतर मात्र पोलिस तपासाची चक्रे वेगाने फिरली.