खंडाळा : महान्यूज लाईव्ह
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका हॉटेलमध्ये सुरु असणा-या विनापरवानगी लग्न समारंभाला शिरवळ पोलीसांनी जोरदार दणका दिला. २५ हजार रुपयांचा हॉटेल व्यवस्थापनाला दंड ठोठावत, लग्न समारंभ असणा-या कुंटुंबियांनाही दंड भरण्याची नोटीस बजावली
शिरवळ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर कुंभार यांनी हा २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला व लग्न समारंभ असणा-या कुंटुंबियांना दंड भरण्याची नोटीस बजावल्याने शिरवळसह खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ (ता.खंडाळा) याठिकाणी पळशी (ता.खंडाळा) येथील एका कुटुंबियांचे लग्न समारंभ प्रशासनाची परवानगी न घेता विनापरवानगी सुरु असल्याची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मधुकर कुंभार यांना मिळाली.
त्यानुसार पोलीस हवालदार मधुकर कुंभार हे संबंधित हॉटेलमधील हॉलमध्ये गेले असता त्याठिकाणी विनापरवानगी लग्न समारंभ सुरु असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलीस हवालदार मधुकर कुंभार यांनी याबाबतची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांना दिली असता, निरीक्षक इंगळे यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले.
यावेळी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचा भंग करीत व कोरोना विषयक दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला २५ हजार रुपये दंड भरण्याची सूचना पोलीस हवालदार मधुकर कुंभार यांनी हॉटेल व्यवस्थापनाला करताच संबंधित हॉटेल व्यवस्थापनाने शिरवळ ग्रामपंचायत प्रतिनिधीकडे २५ हजार रुपयांचा दंड भरला. यावेळी लग्न समारंभ असणाऱ्या कुंटुंबियाला पोलीस हवालदार मधुकर कुंभार यांनी दंड भरण्याबाबतची नोटीस बजावली.