इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा ब्रिटिशकालीन तलाव असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेलीच्या परिसरात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. तलावातील पाण्याची पातळी जास्तच खालावत चालली आहे. या तलावावर पंचक्रोशीतील हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे. या तलावात पाणी सोडण्यात यावे,अशी मागणी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय शिंदे व शेतकऱ्यांनी केली आहे.
शेटफळ हवेली येथे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा ब्रिटिशकालीन तलाव आहे. या तलावावर शेटफळ हवेली व पंचक्रोशीतील हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे. या बरोबरच शेटफळ हवेली, लाखेवाडी, भोडणी, काटी आदी गावांच्या पाणी पुरवठा योजनाही याच तलावावरती अवलंबून आहेत.
प्रत्येक वर्षी जूनच्या सुरूवातीलाच भाटघर धरणातून पाणी सोडण्यात येते, परंतु या वर्षी जून महिना उलटून गेला तरी, अद्याप पाणी सोडण्यात आले नसून पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पुढील काही दिवसांत तलावात पाणी सोडले नाही तर शेतीबरोबरच पाणी पुरवठा योजनांनाही त्याचा फटका बसणार आहे असे संजय शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या मागणीचा विचार करून शेटफळ तलाव पुर्ण भरून घ्यावा नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.