बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथील ही घटना! गावातील पवारवस्ती येथील शालन भुजंग वाबळे या शेतकरी महिलेने वडगाव निंबाळकर पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि त्यावरून पोलिसांनी दीपक बापूराव वाबळे, सर्जेराव नाना वाबळे, अनिल लक्ष्मण वाबळे, राहुल रामदास वाबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेली माहिती अशी शालन वाबळे यांच्या कुटुंबीयांनी दिपक वाबळे यांच्या कडून प्रतिमहिना दहा टक्के व्याजदराने सन 2017 मध्ये दोन लाख रुपये घेतले होते. या रकमेचे व्याज पाच लाख रुपये झाल्याने वरील चौदा आरोपींनी शालन वाबळे यांना पैसे नसतील तर जमीन नावावर करून देण्याची मागणी केली. त्यावरून शालन वाबळे यांनी दिपक वाबळे यांच्या नावे दोन वर्ष मुदतीने खरेदी खत करून दिले.
दोन वर्षानंतर ही जमीन परत करायची होती त्यानुसार वाबळे या सात लाख रुपयांची रक्कम घेऊन दिपक वाबळे यांना आमची जमीन परत आम्हाला माघारी द्या असे म्हणाल्या, तेव्हा अजून आमचे दहा लाख रुपये आहेत असे फिर्यादी दिपक वाबळे यांनी सांगितले. संपूर्ण पैसे दिल्याखेरीज जमीन देणार नाही असे दिपक वाबळे यांनी सांगितल्यावरून शालन वाबळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी वरील गुन्हा दाखल केला. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.