पहिल्या टप्प्यात मुंबई, पुण्यासह १५ कोरोनाप्रभावित शहरे वगळून शाळा सुरू होणार
मुंबई : महान्यूज लाईव्ह
पालकांसाठी एक वेगळी बातमी राज्य सरकारने दिली आहे, ती म्हणजे १५ जून पासून रेड झोन वगळता राज्यातील इतर शाळा सुरू होण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेले हे संकेत दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही या शब्दाशी मिळतेजुळते आहेत.
राज्याचा शिक्षण विभाग यासंदर्भात नवी मार्गदर्शक सूचना तयार करीत आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली असून वर्षा गायकवाड यांनी देखील सुरवातीच्या टप्प्यात सम विषम रोल क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बोलावण्याबाबतही सरकार विचार करीत असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कदाचित राज्यातील शैक्षणिक वर्षाचे कामकाज सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलले जाईल अशी सुरवातीपासून चर्चा होती. तशा प्रकारचे अंदाजही व्यक्त केले जात होते. मात्र कोरोनाचे संकट काही संपण्याची शक्यता नसल्याने विविध क्षेत्रात फक्त नुकसानच होत असल्याने राज्य सरकारने काही पावले उचलली आहेत.
यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशी कोरोनाबाधितांची संख्या वाढती राहणारी १५ शहरे वगळता इतर ठिकाणच्या प्राथमिक, खासगी शाळा नव्या शैक्षणिक वर्षानुसार म्हणजे १५ जून पासून सुरू होतील. यामध्ये एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेत सम विषम रोल क्रमांकानुसार शिफ्टनिहाय विद्यार्थ्यांना बोलावण्यात येईल. शाळांमध्ये सकाळच्या वेळी होणाऱ्या सामूहिक परिपाठावर बंदी कायम राहील. शिक्षक व विद्यार्थ्यांदरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना सरकार करणार आहे. शाळेचे सध्याचे कामाचे तास कमी करण्याचाही विचार सरकार करीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.











????