मुदत संपल्याने कोणताही धोरणात्मक निर्णय नको- पृथ्वीराज जाचक
लासुर्णे : महान्यूज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत १५ मे रोजी संपली असून आता कोणताही धोरणात्मक निर्णय संचालक मंडळाने घेऊ नये व संपलेल्या हंगामातील शिल्लक असलेली प्रतिटनी ४०० रुपयांची एफआरपी विलंब व्याजासहीत त्वरीत द्या अशी मागणी कारखान्याचे माजी अध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केली आहे.
जाचक यांनी यासंदर्भात छत्रपती कारखान्याचे कार्यकारी संचालक गोविंद अनारसे यांना पत्र दिले असून यासंदर्भातील एक निवेदन साखर आयुक्तालयासही पाठवले आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. मात्र अशा स्थितीचा फायदा घेऊन कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले जाऊ नयेत यासाठी जाचक यांनी कार्यकारी संचालकांना संचालक मंडळाची मुदत संपल्याचे लक्षात आणून दिले आहे. संपलेल्या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसापोटी प्रतिटनी ४०० रुपयांची एफआरपी संचालक मंडळाने शिल्लक ठेवलेली आहे, ती नियमानुसार गाळपास आलेल्या उसाच्या १४ दिवसांपासून जो विलंबावधी आहे, त्या विलंबावधीचे व्याजही सभासदांना द्यावे अशी मागणी जाचक यांनी केली आहे. त्याचबरोबर सन २०१८-१९ मधील एफआरपीचे व्याज दिलेले नाही, ते व्याजही परत करावे अशी मागणी जाचक यांनी केली आहे. जाचक यांनी याच पत्रात कारखान्याने सभासदांना सातबारा उतारे मागितले आहेत, त्यावरूनही लक्ष्य केले असून हे उतारे मागण्याचे प्रयोजन संचालक मंडळाने सभासदांपुढे मांडावे असेही आवाहन केले आहे.
नव्या नोकरभरतीवरून होणार वादंग?
साखर आयुक्तांच्या पूर्वपरवानगीखेरीज आता कोणतीही नोकरभरती अथवा इतर धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत अशी सूचना देखील केली आहे. कारखान्याने आता ११ पदांची अधिकाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आता संचालक मंडळ व शेतकरी कृती समितीमध्ये यावरून वादंग होण्याचीही चिन्हे आहेत. जाचक यांनी कारखान्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीमुळे कोणताही अतिरिक्त खर्च करण्यावर आक्षेप घेतलेला आहे.










