बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती मधील सीएलसी कंपनीमध्ये सीमेंस कंपनीचे इलेक्ट्रिक ड्राइव्ह व इन्व्हर्टरचे पाच सीपीयू यांची तब्बल अकरा लाखांची चोरी केली. बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत अकरा लाखांच्या मुद्देमालासह संशयित आरोपी ताब्यात घेतला. एक जण फरारी असून दोन्ही आरोपी परराज्यातील आहेत.
बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती एमआयडीसीतील चौधरी लाल चौधरी अँड सन्स या कंपनीमध्ये धागा निर्मिती केली जाते. या कंपनीचे सिमेंस कंपनीचे आठ लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रिक ड्राईव्ह आणि पाच इन्वर्टर सीपीयू चोरीला गेले. त्यासंदर्भात बारामती तालुका पोलिस ठाण्यात कंपनीच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आली होती.
त्यावरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आणि गोपनीय माहितीच्या आधारे बारामती तालुका पोलिसांनी लाल मोहन मौर्य व मुकेश गौड हे दोन संशयितांवर नजर वळवली. यानंतर वेगवान हालचाली करत कुर्ला, मुंबई येथील लाल मोहन मौर्य याला अटक करण्यात आली, तर मुकेश गौड (वय 27, रा. कुशीनगर उत्तर प्रदेश) हा आरोपी मात्र पळून गेला. दरम्यान लालमोहन मौर्य याच्याकडून अकरा लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, योगेश लंगोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.