विशाल कदम :-महान्यूज लाईव्ह
पुणे : वानवडी (पुणे) येथील डॉक्टर दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कारण एका पेशंटच्या (रुग्णाच्या) संबंधित असल्याचे सुसाईड नोटमुळे समोर आले आहे.
डॉ. निखिल दत्तात्रय शेंडकर (वय-२८) आणि त्यांची पत्नी डॉ. अंकिता निखिल शेंडकर (वय-२६, दोघेही रा. गल्ली नंबर दोन, आझादनगर, वानवडी ) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
डॉ. निखिल आणि डॉ. अंकिता यांचा डिसेंबर २०१९ मध्ये विवाह झाला होता. निखिल हे आई-वडील आणि पत्नी डॉ. अंकिता यांच्यासमवेत आझादनगर, वानवडी येथे एका इमारतीच्या सदनिकेमध्ये राहत होते. डॉ. निखिल आणि डॉ. अंकिता सदर इमारतीच्या खालच्या मजल्यावर शेंडकर नावाने रुग्णालय चालवत होते. या दोघांमध्ये एक पेशंट पाहण्यावरून वाद झाला. आणि त्यातूनच डॉ. अंकिता हिने बुधवारी (ता. ३०) आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचल्याचे वास्तव समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे पत्नी डॉ. अंकिता हिचा दुसर्या दिवशी गुरुवारी (ता. १) सावडण्याचा विधी करण्यास सकाळी जाण्याची तयारी करताना डॉ. निखिल कुटुंबाला फ्रेश होतो, असे म्हणून बाथरूममध्ये गेला. आणि त्याने ओढणीच्या सहाय्याने खिडकीला गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार काही वेळात कुटुंबाला लक्षात आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील, पोलीस निरीक्षक दीपक लगड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांना डॉ. निखिलन यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन महिन्यापासून निखिल हे यवत जवळील कासुर्डी येथे रुग्णालय चालवत होते. बुधवारी (ता. ३०) डॉ. निखिल यांचा एका मानसिक रुग्ण सतत फोन करीत होता. पण डॉ निखिल रुग्णालयात नसल्याने सदर रुग्णाला पाहण्यासाठी डॉ. अंकिता यांना फोन केला. आणि संगितले की, तो पेंशट सतत फोन करत असून, तू एकदा पाहून घे असे सांगितले. मात्र डॉ. अंकिता यांनी त्याला नकार दिला आणि यावरूनच डॉक्टर दाम्पत्यांमध्ये वाद झाला. बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास डॉ. निखिल घरी गेले असता. त्यांनी अंकिताचा आवाज दिला आणि बेडरूमचा दरवाजा वाजवला परंतु, अंकिताने कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. यामुळे डॉ.निखिल यांनी दरवाजा तोडला आणि आत जाऊन पहिले असतं, पत्नी अंकिता हिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, डॉ. शेंडकर दाम्पत्याची कोरोना काळात अनेकांची मदत करून समाजसेवा केली होती. त्यांनी रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रूग्णाला धीर देत कोरोनाबाबत माहिती देऊन भिती घालवली होती. तसेच रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार उपचार केले होते. त्यामुळे डॉ. शेंडकर दाम्पत्याच्या आत्महत्येने परिसरात धक्का बसला आहे.
डॉ. निखिल याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले आहे. तसेच अंकिताच्या नातेवाईकांची माफी मागितली आहे.