महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारामुळे सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत जातपंचायती वर न्हावाशेवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
मुंबई : महान्यूज लाईव्ह
उलवे (नवी मुंबई) येथील रहिवाशी रोहन राजू गरुड यांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात दाखल आहे. तरीही सदर घटस्फोटाचा निवाडा जातपंचायतीद्वारे केला जावा असा दबाव गरुड कुटुंबीयांवर आणला गेला.
55 वाड्यांची जातपंचायत भरवून गरुड कुटुंबीयांना जातीतून बहिष्कृत करून वाळीत टाकले. मारहाण व दंड करू अशा धमक्या फोन वरून व व्हाट्सअपवरून दिल्या. रोटी-बेटी, मानपान बंद करण्याच्या धमक्या दिल्या. असे प्रकार जातपंचायतीद्वारे गेल्या सहा महिन्यापासून चालू राहिले. त्यामुळे याबाबतची तक्रार अंनिसच्या कार्यकर्त्यांकडे गरुड कुटुंबीयांनी केली.
त्याचा पाठपुरावा कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील न्हावाशेवा पोलीस स्टेशन मध्ये गोंधळी समाजाच्या पंचावर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नंदिनी जाधव, प्रा प्रवीण देशमुख, राजू देशपांडे हे राज्य पदाधिकारी व ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वानखडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हा गुन्हा दाखल करण्यासाठी न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांचे सहकार्य लाभले.