संदीप मापारी पाटील, बुलढाणा
बुलढाणा तालुक्यात निसर्गाने कहर केला. काल संध्याकाळी चार ते सहा या अवघ्या दोन तासांत ढगफुटीचा प्रत्यय अनेक गावांनी अनुभवला. चिखली तालुक्यातील आमखेड येथील तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर जमीन खरवडून वाहून गेली. गांगलगाव येथे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पातळी ओलांडून नदी वाहिली. नदीच फुटल्याचे चित्र निर्माण झाले आणि यातही जमीनी वाहून गेल्या.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस नव्हता. हवामान खात्यानेही पाऊस दडी मारून असून येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस पडणार नाही असा अंदाज वर्तवला होता. मात्र अचानक आलेल्या पावसाने रुद्रावतार दाखवला. चिखली तालुक्यातील कोलारा, तेल्हारा, एकलारा, भालगाव, येवता, गांगलगाव, खैरव या गावांनी अक्षरशः ढगफुटी अनुभवली. संध्याकाळी चार ते सहा या दोन तासांमंध्ये पावसाचे तुफान लोकांनी पाहिले. या पावसाने तलाव फुटले. नदी ओसंडून वाहिली.
अगोदरच दुबार पेरणीच्या भीतीने असलेल्या या भागातील शेतकऱ्यांनी जमीनच उरली नसल्याचे स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवले. या पावसात २५० शेतकरी अडकले. नंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बुलढाणा जिल्ह्.यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये असा पाऊस झाला. सवडद, मोहाडी, राताळी, सावरखेर्डा, शिंदी या गावांतही जमीनी वाहून गेल्या.