कंडारेला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील इंदूर येथून केली अटक
विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
११०० कोटींच्या बीएचआर पतसंस्थेच्या अपहार व फसवणूकीचा अवसायक मात्र नंतर प्रमुख सूत्रधार असलेल्या जितेंद्र गुलाबराव कंडारे याला इंदूरमधून ताब्यात घेतले. जितेंद्र कंडारे याची खरेतर शासनाने बीएचआर पतसंस्थेवर आवसायक म्हणून नेमणूक केली होती. त्याने पतसंस्थेतील कर्ज वसुल करुन मालमत्तेचा लिलाव करुन ते पैसे ठेवीदारांना व देणेदारांना परत करायचे ते राहीले बाजूला. त्यानेच ठेवीदारांची फसवणूक करीत मोठा आर्थिक गैरव्यवहार केला होता. तो गेली काही महिने फरार होता. मात्र पुण्याच्या बहाद्दर पोलिसांनी आणखी एक कामगिरी करीत परप्रांतातून त्याला शोधून काढले. मध्यप्रदेशातून कंडारे याचा माग काढत पोलिस त्याच्यापर्यंत पोचले आणि त्याला ताब्यात घेतले.
ठेवीदार व सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांच्या २५ नोव्हेंबर २०२० रोजी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनंतर बीएचआर घोटाळा पुढे आला. तो एवढा मोठा असेल असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र हजारो ठेवीदाराच्या विश्वासाला तडा देणारा हा घोटाळा ठरला. २६ नोव्हेंबर रोजी पुणे पोलिसांनी जळगावात एकाच वेळी अनेक ठिकाणी कारवाई केली. मात्र तोपर्यंत संस्थेवर आवसायक नेमलेला जितेंद्र कंडारे व सुनील झंवर हे फरार झाले. त्यांचे अटकपूर्व जामीनाचे अर्जही पुणे व मुबईत फेटाळले. मात्र त्यानंतर तो फरार झाला. गेली सात महिने तो फरार होता.
पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांना कंडारे हा इंदूर येथील एका नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुण्यातून एक पथक तातडीने इंदूरला रवाना झाले. या पथकाने सोमवारी रात्री ९ वाजता कंडारे याला पकडले आहे.
हे पथक कंडारेला घेऊन पुण्यात पोहोचणार आहे. या गुन्ह्यातील कंडारे याचा साथीदार सुनील झंवर अद्यापही फरार आहे. याच गुन्ह्यांत गेल्या पंधरवड्यात भागवत भंगाळे, प्रेम कोगटा, जयश्री तोतला, जयश्री मणियार, जितेंद्र पाटील, छगन झाल्टे यांच्यासह बड्या ११ कर्जदारांना अटक झाली होती. हे सर्व संशयित पुणे कारागृहात आहेत.