मुंबई : महान्यूज लाईव्ह
ही कहाणी आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील वनसगावच्या शिवसैनिकाची… त्याच्या कंत्राटदार भावाने शासकीय कंत्राट घेतले होते. कामही पूर्ण करून दिले. मात्र त्याच्या कामाचे पैसे काही मिळेनात.. दहा लाखांची रक्कम काही थोडीथोडकी नव्हती.. पैशासाठी चकरा मारून तो थकला.. मग त्याच्या भावाच्या चकरा सुरू झाल्या…तोही थकला. शेवटी अजितदादांचा पर्याय त्याच्यापुढे उरला. दादांच्या कानावर विषय गेला की, जागेवर निर्णय होतो असे तो ऐकून होता… त्याने अजितदादांना साकडे घातले…आणि त्याच्यासकट ज्यांचे, ज्यांचे पैसे थकले होते, त्या सर्वांनाच त्यांची देयके चुकती करण्याचा आदेश मंत्रालयातून निघाला… तो आपसूक बोलून गेला.. दादा मनापासून धन्यवाद…!
वैभव शिंदे यांचे बंधू सागर शिंदे हे कंत्राटदार आहेत. त्यांनी निफाड तालुक्यातील वनसगाव येथील २५-१५ योजनेंतर्गत सभामंडपाचे काम घेतले. सन २०१८-१९ मध्येच त्याने हे काम पूर्ण केले होते. मग त्याने काम पूर्ण झाल्यानंतर कामाच्या पैशासाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र शासकीय अधिकारी त्याला ताकास तूर लागू देत नव्हते. त्या कामात त्याने स्वतःचा पैसा अडकवला होता. बेरोजगार होण्यापेक्षा काहीतरी करायचे म्हणून नव्याने बांधकाम व्यवसायात उतरलेल्या सागर यांना लालफितीचा पहिलाच फटका जोरात बसल्याने त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.
नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन त्यांनी हे काम सुरू केले होते. पैसे काही मिळेनात. मग शिवसैनिक असलेल्या वैभव शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला. ही फाईल नुकतीच उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याच्या कार्यालयात आल्याचे त्याच्या लक्षात आले. मग त्याने तेथेही पाठपुरावा सुरू केला. तेवढ्यात त्याला कोणीतरी अजितदादा म्हणजे ऑन दी स्पॉट निर्णय, होणार असेल तर लगेच करून देतील, नाही होणार, तर स्पष्ट सा्ंगतील असे कोणीतरी सांगितले. या पठ्ठ्याने थेट ट्विटच केले. दादा मी तुम्हाला आठ दिवसांपासून संपर्क करतोय, मात्र प्रतिसाद मिळत नाही. बॅंकेने व नातेवाईकांनी पैशासाठी तगादा लावलाय, जर पैसे लवकर मिळाले नाहीत, तर भावाला गळफास घ्यावा लागेल अशा अर्थाचे ट्विट त्याने केले.
हे ट्विट पाहून बारामतीतील राष्ट्रवादीचे सोशल मिडियावरील सक्रीय पदाधिकारी व बाबुर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, तुषार लोखंडे व इतर सहकाऱ्यांनी अजितदादांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे या्ंच्या कानावर ही बाब घातली. मुसळे यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत अजितदादांच्या निदर्शनास ही बाब आणली. आणि त्यातील महत्व व ग्रामीण भागातील मुलांचे गुंतलेले व थकलेले पैसे लक्षात घेत अजितदादांनी संबंधितांना फैलावर घेत तातडीने सूचना केल्या.
दोन दिवसातच त्याचा अध्यादेश निघाला.. विशेष म्हणजे त्याच्या एकट्याचे नव्हे तर नाशिकमधील ७०५ कामांचे ४६ कोटींच्या रकमेपैकी उर्वरित २० कोटींचे बील देण्याचे आदेशच रूजू झाले. थोडक्यात वैभव शिंदे व सागर शिंदे यांच्यामुळे तब्बल ७०५ कामांची बिले मार्गी लागली. अर्थात याला कारण ठरले अजितदादा…! काल वैभव शिंदे याने ट्विट करीत दीड वर्षांचा पाठपुरावा दीड दिवसांत दादांनी मार्गी लावला म्हणत अजितदादा थॅंक यू.. असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली..!