ठाणे : महान्यूज लाईव्ह
सध्या शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नाही, त्यामुळे ऑनलाईन क्लाससाठी शिक्षकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत मोबाईलच्या रेंजचा प्रश्न कायम भेडसावतो आहे. मात्र हाच प्रश्न पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात ओसरवीरा गावात मानकरपाडा येथील मुलांच्या जिवावर बेतला. रेंज मिळत नाही, म्हणून झाडावर चढलेल्या मुलांच्या अंगावर वीज कोसळली. यात एका मुलाचा दुर्देवी अंत झाला. काल संध्याकाळी ही घटना घडली.
काल संध्याकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान ही घठना घडली. सहावी ते नववीमध्ये शिकत असलेली चार मुले झाडावर चढली होती. त्यापैकी रवीन बच्चू कोरडा (वय १७ वर्षे) हा नववीतील विद्यार्थी वीज अंगावर कोसळून जागीच ठार झाला. तर मेहुल अनिल मानकर (वय १२ वर्षे), दिपेश संदीप कोरडा (वय ११ वर्षे) आणि चेतन मोहन कोरडा (वय ११ वर्षे) हे तिघे गंभीर जखमी झाले. या तिघांवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मेहुल मानकर यास खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
मोबाईलच्या रेंजचा आणि ऑनलाईन शिक्षणाचा मागील वर्षापासून सुरू असलेला हा प्रकार जीवघेणा ठरेल असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र एकीकडे ऑनलाईन शिक्षण व दुसरीकडे त्यामुळे मोबाईल हातात असल्यामुळे मुलांच्या डोळ्याला व सामाजिक सुरङक्षेलाही मोठा धोका पोचला आहे.