व्याजासह गिफ्ट देण्यास नकार दिल्याने, मावशीकडुन तत्कालीन नवरी मुलीसह सासरच्या नातेवाईकांनाही बेदम मारहान…. पोलिसात गुन्हा दाखल
विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पुणे : पुणे तिथे काय उणे ही म्हण काय उगीच प्रसिद्ध झालेली नाही. आता हेच बघा ना! लोकांना दोन दिवसांपूर्वी कोणती भाजी खाल्ली आठवत नाही; पण पुण्यातल्या एका कुटुंबामध्ये अठरा वर्षांपूर्वी मावशीने भाचीला लग्नात भेट दिलेल्या सहा सोन्याच्या बांगड्या मावशीला एकदम लख्ख आठवल्या आणि कशावरून तरी सुरु झालेले भांडण सोन्याच्या बांगड्या पर्यंत पोहोचले. सोन्याच्या बांगड्याची व्याजासह रक्कम परत करण्याची मागणी मावशीने केली आणि एवढेच नाही तर भाची आणि तिच्या नवऱ्याचा सासरच्या मंडळींना बदडले..!
विशेष म्हणजे भाची देखील मावशी एवढीच तगडी! तिने चक्क या बांगड्या माघारी देण्यास नकार दिला आणि मावशीने सावकारी कायदा लागू असतानादेखील सख्या भाचीकडून या बांगड्यांची व्याजासह रक्कम मागितली. भाजी ने नकार देताच मावशीने तिचे नातेवाईक बोलावले आणि भाचीसह तिच्या सासरच्या मंडळींना बेदम मारहाण केली. आणखी एक योगायोग म्हणजे, या सार्यांची वरात समर्थ पोलिस ठाण्यात पोहोचली. गुन्हा दाखल झाला असल्याने पुढील तपास करण्यास पोलीस समर्थ आहेत असे पोलिस सांगत आहेत..!
पुण्यातील नाना पेठेतील ही अद्भुत व चर्चेतील कहाणी आहे. अठरा वर्षांपूर्वी वीस वर्षाची असलेल्या भाचीचे लग्न झाले. त्या दिवशी मावशीने लग्नात भाचीला भेट म्हणून सोन्याच्या त्यावेळेच्या दरानुसार सहा हजार रुपयांच्या बांगड्या दिल्या. आता मात्र मावशी आणि भाची मध्ये काही कारणावरून वाद उफाळला असून, या वादाची परिणती भाचीला दिलेल्या भेटवस्तूपर्यंत पोचली.
मावशीने या भेटवस्तू परत मागितल्या; एवढेच नाही त्यावेळी सहा हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या आता तीस हजार रुपये किमतीच्या झालेल्या असून तेवढे पैसे व्याजासह मला मिळाले पाहिजेत अशी मागणी मावशीने भाचीकडे केली. मात्र भाचीने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे मावशीने तिचे नातेवाईक बोलून तिच्या घरी राडा घातला आणि भाचीसह सासरच्या मंडळींना मावशीच्या नातेवाईकांनी बदड बदड बदडले. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात 38 वर्षीय विवाहित महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार समर्थ पोलिसांनी मावशी व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.