मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यात महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत आणि हे सरकार पाच वर्षे टिकेल असे खुद्द शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले सांगत असले तरी सातत्याने या नेत्यांमधील भेटीगाठी वाढत आहेत. आज दिवसभरात दोन वेळा संजय राऊत मुख्यमंत्र्यांना भेटले, तर त्यानंतर लागलीच ते सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांना भेटले आहेत.
शिवसेना व राष्ट्रवादीत वाढती जवळीक असल्याचा हा परिणाम की, शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात मतभेदाची दरी रुंदावल्याचा परिणाम असे अनेक अर्थ या भेटीसंदर्भात काढले आहेत. मात्र या भेटीनंतर खुद्द संजय राऊत यांनी ही सहज भेट होती. मी नेहमीच पवारसाहेबांना भेटत असतो असे सांगून त्यांनीच मुख्यमंत्र्यांना प्रशस्तीपत्र दिले असून हे सरकार पाच वर्षे टिकेल असे स्पष्ट केले.
दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांना सातत्याने यावर स्पष्टीकरण का द्यावे लागत आहे असा सवाल उपस्थित केला जात असून कॉंग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादीतील जवळीकही वाढत चालली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीत सर्वच आलबेल नसल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या छापेमारीचा, प्रताप सरनाईक यांच्या पत्राचा व विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्या संभ्रमित करणाऱ्या भूमिकांचाही संदर्भ याच्याशी जोडला जात आहे.