बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव साखर कारखान्यातील दुर्घटनेत मिथेन गॅसमुळे अस्वस्थ झालेल्या कामगारांवरील सुरू असलेल्या उपचाराची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती घेतली व हे कामगार लवकर बरे होण्यासाठी सूचनाही केल्या.
माळेगाव साखर कारखान्यात आज सकाळी साखरेच्या पॅनची स्वच्छता करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना त्यात मिथेन गॅस तयार होऊन कामगारांना त्याची बाधा झाली. १३ कामगारांचा श्वास गुदमरू लागल्याने त्यांना बारामतीत उपचारासाठी भाग्यजय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यापैकी आवश्यकता असलेल्या आठ कामगारांवर उपचार सुरू आहेत. आज बारामतीत आलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर ही माहिती जाताच त्यांनी तातडीने भाग्यजय हॉस्पिटलला भेट दिली व डॉ. आर.डी. वाबळे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून उपचाराची माहिती घेऊन कामगार लवकर बरे व्हावेत यासाठी काही सूचनाही केल्या. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, गटनेते सचिन सातव यांच्यासह संचालक राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, अनिल तावरे, मदनराव देवकाते, नितीन सातव, सुरेश खलाटे आदी उपस्थित होते.










