खंडाळा : महान्यूज लाईव्ह
लोणंद-शिरवळ रस्त्यावर लोणी ता.खंडाळा गावच्या हद्दीतील वळणावर दगड फोडण्याची मशिन घेऊन निघालेला कंटेनर पलटी होऊन शाँटसर्किटमुळे लागलेल्या आगीत चालक गंभीर जखमी झाला. दरम्यान,शिरवळ पोलीसांनी दाखविलेल्या धाडसामुळे कंटेनर चालकाचा जिव वाचविण्यात यश आले आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की,
कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून मुंबई याठिकाणी दगड फोडण्याची मशिन घेऊन कंटेनर (क्रं.एमएच-46-एच-6601) चालक संभाजी बिरु शिंगाडे (वय 35,रा.बिळूकी ता.जत जि.सांगली) हा क्लिनर धानाप्पा आप्पासो सरगर याच्यासमवेत निघाला होता.
दरम्यान,कंटेनर हा लोणंद-शिरवळ रस्त्यावरील लोणी गावच्या हद्दीतील एका अवघड वळणावर आला असता चालक संभाजी शिंगाडे याचे वाहनावरील नियंञण सुटून कंटेनर हा महामार्गावर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली.
यावेळी पलटी झालेल्या कंटेनरने शाँटसर्किटमुळे अचानकपणे पेट घेतला. यावेळी अचानकपणे कंटेनरला लागलेल्या आगीमुळे घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी चालक संभाजी शिंगाडे याने क्लिनर धानाप्पा सरगर याच्यासमवेत उपस्थित नागरिकांच्या व लोणी ग्रामस्थांच्या मदतीने कंटेनरला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला.
मात्र हा प्रयत्न करत असताना चालक संभाजी शिंगाडे याच्या अंगावर कंटेनरमधील आँईल सांडून आगीमध्ये होरपळून भाजला गेला. तत्पूर्वी या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलीस हवालदार धिरजकुमार यादव, नितीन महांगरे, विकास इंगवले यांनी घटनास्थळी धाव घेत शिरवळ एमआयडीसी मधील एशियन पेंटस कंपनीच्या अग्निशमन बंबाच्या साहाय्याने कंटेनरची आग विझविण्यात यश मिळविले.
दरम्यान,आगीमध्ये होरपळले गेलेल्या चालक संभाजी शिंगाडे हा भाजल्याने विव्हळत असल्याचे व 108 रुग्णवाहिकेला काँल करुनही उपलब्ध न झाल्याने तसेच खाजगी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने शिरवळ पोलीसांनी तत्काळ पोलीसांच्या जीपमधून जखमी झालेल्या संभाजी शिंगाडे याला तत्काळ शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.