इंदापूर : महान्यूज लाईव्ह
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचे राजकिय आरक्षण राज्य सरकारच्या अक्षम्य दुर्लक्ष आणि नाकर्तेपणामुळे संपुष्टात आल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. भिगवण (ता.इंदापूर) येथे भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, अनैसर्गिकपणे आलेले राज्य सरकार मराठा, धनगर, ओबीसींच्या आरक्षणाबाबत गंभीर नाही. मराठा व ओबीसी आरक्षण रद्द झाले तर धनगर आरक्षणाबाबत हे सरकार एक शब्दही बोलत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सरकारला सुचित करुनही सरकारने ओबीसीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.
केवळ राज्य सरकारच्या वेळकाढुपणामुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या 5 जिल्हा परिषद व 33 पंचायत समिती मध्ये निवडणुका जाहीर करुन ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार केले आहे असा आरोप यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केला.
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत भाजप गप्प बसणार नाही असे त्यानी ठामपणे सांगितले. आरक्षण संपुष्टात आले असल्याने आता तरी राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन पुढील कारवाई करावी. ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाची राज्य सरकारला चाड असेल तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द केलेले आरक्षण पूर्ववत करावे. रोहिणी आयोगाशी चर्चा करण्यासाठी त्वरित समिती गठित करण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी केली.
यावेळी इंदापुर तालुका भाजपचे ॲड.शरद जामदार, मारुती वणवे, श्रीमंत ढोले, माऊली चवरे, गजानन वाकसे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द झालेले आरक्षण पुर्ववत करावे, ओबीसी आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग गठीत करावा, ओबीसी समाजाचा जातनिहाय जनगणना करावी, आरक्षण पुर्ववत होईपर्यंत निवडणुका रद्द कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन पोलिस व महसुल प्रशासनास देण्यात आले
दरम्यान याबाबतचे निवेदन भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, मयुरसिंह पाटील, मारुती वणवे, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, माजी सरपंच पराग जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, युवा मोर्चाचे अध्यक्ष राम आसबे, बाळासाहेब पानसरे, तेजस देवकाते, अशोक वनवे, संपत बंडगर, रणजित भोंगळे, प्रशांत वाघ, संदीप खुटाळे, तेजस देवकाते, संजय जगताप, माउली मारकड, दिनानाथ मारणे, हनुमंत काजळे, अभिमन्यू खटके, जयदीप जाधव, कपिल भाकरे, अशोक पाचांगणे, संजय भरणे उपस्थित होते.